Jnanpith Award 2024: प्रसिद्ध लेखक विनोद कुमार शुक्ला यांना 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
Jnanpith Award 2024: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ला यांना देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडमधील पहिले लेखक असतील. 88 वर्षीय शुक्ला हे त्यांच्या कथा, कविता आणि लेखांसाठी ओळखले जातात आणि समकालीन हिंदी साहित्यातील सर्वात प्रभावशाली लेखकांपैकी एक आहेत. या पुरस्काराचे स्वरूप 11 लाख रुपये रोख, देवी सरस्वतीची कांस्य मूर्ती आणि प्रशस्तिपत्र असे आहे.
हा एक मोठा सन्मान आहे -
हा सन्मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विनोद कुमार शुक्ला यांनी सांगितले की, 'त्यांनी कधीही याची कल्पनाही केली नव्हती. हा खूप मोठा पुरस्कार आहे. मला तो मिळेल असे कधीच वाटले नव्हते. खरं तर, मी कधीही पुरस्कारांकडे लक्ष दिले नाही. लोक मला अनेकदा म्हणायचे की मला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला पाहिजे, पण मी काय बोलू? संकोचामुळे मला कधीही योग्य शब्द सापडले नाहीत.' लेखन ही छोटी गोष्ट नाही, ती सतत करत राहावी. लेखकांनी वाचकांच्या प्रतिसादाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत यावेळी शुक्ला यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Maharashtra Bhushan Award 2024: राम व्ही सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण 2024' पुरस्कार जाहीर
दरम्यान, ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत विनोद कुमार शुक्ला यांचे नाव अंतिम करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका प्रतिभा रे यांनी भूषवले. निवड समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'हा सन्मान विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी, सर्जनशीलतेसाठी आणि अद्वितीय लेखनशैलीसाठी देण्यात येत आहे.'
विनोद कुमार शुक्ला यांचे साहित्य -
विनोद कुमार शुक्ला यांच्या कामांमध्ये 'देअर वॉज अ विंडो इन द वॉल' (ज्यासाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला), 'नौकर की कमीज' आदीचा समावेश आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये करण्यात आली. हा पुरस्कार फक्त भारतीय लेखकांना दिला जातो.