कर्करोगाविरोधातील संशोधनात रशियाने एक मोठी झेप घेत

Russia cancer vaccine: कर्करोगमुक्त जगाचे स्वप्न आता वास्तवात? रशियाची लस चर्चेत

Russia cancer vaccine: कर्करोगाविरोधातील संशोधनात रशियाने एक मोठी झेप घेतली आहे. जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे कारण मानल्या जाणाऱ्या कर्करोगावर आता प्रभावी शस्त्र सापडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाने विकसित केलेल्या ‘एंटरॉमिक्स’ या नव्या mRNA कर्करोग लसीचे क्लिनिकल चाचणीतील निकाल तब्बल 100 टक्के यशस्वी ठरल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. ही लस पारंपरिक उपचार पद्धतींप्रमाणे केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया यांच्यावर अवलंबून नसून प्रत्येक रुग्णाच्या शरीररचनेनुसार व कर्करोगाच्या प्रकारानुसार तयार केली जाते. म्हणजेच ही लस पूर्णतः वैयक्तिक स्वरूपाची (personalized) असल्यामुळे रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीला बळकटी मिळते आणि शरीर स्वतः कर्करोग पेशींवर हल्ला करते.

संशोधकांच्या माहितीनुसार, या लसीमुळे रुग्णांना गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत. उलट रुग्णांनी ती सहज सहन केली आणि प्रतिकारशक्ती अधिक मजबूत झाल्याचे आढळले. या वैशिष्ट्यांमुळे एंटरॉमिक्स भविष्यातील कर्करोग उपचार क्षेत्रात एक मोठे पाऊल मानले जात आहे. ही लस रशियाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडियोलॉजिकल सेंटर आणि एंगलहार्ड्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यात चार विशेष प्रकारचे कमी शक्तीचे (attenuated) विषाणू वापरण्यात आले आहेत. हे विषाणू कर्करोग पेशींना नष्ट करतात आणि त्याच वेळी शरीराच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक कार्यक्षम बनवतात. हेही वाचा: Food Delivery Became Expensive: Zomato आणि Swiggy वरून जेवण ऑर्डर करणे महागले; मॅजिकपिन देत आहे सर्वात स्वस्त फूड डिलिव्हरी

काही पूर्वीच्या चाचण्यांत या लसीमुळे केवळ गाठींची वाढ थांबवली जात नव्हती, तर अनेक रुग्णांमध्ये कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाल्याचेही निष्पन्न झाले होते. यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी नवीन आशेचा किरण निर्माण झाला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या होत्या. या चाचणीत 48 स्वयंसेवकांचा सहभाग होता. आता या सर्व प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. मान्यता मिळाल्यानंतर एंटरॉमिक्स हा जगातील पहिला वैयक्तिक mRNA कर्करोग लस म्हणून ओळखला जाईल.

वैद्यकीय तज्ञांच्या मते, जर ही लस प्रत्यक्षात रुग्णांसाठी उपलब्ध झाली तर कर्करोग उपचाराच्या जगात क्रांती घडवेल. आज अमेरिकेतच 2025 पर्यंत दोन दशलक्षांहून अधिक नवे कर्करोग रुग्ण होण्याचा अंदाज आहे, तर सहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू अपेक्षित आहे. अशा स्थितीत एंटरॉमिक्ससारखी लस लाखो रुग्णांसाठी जीवनदान ठरू शकते. रशियाने घेतलेले हे पाऊल संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी काळात या लसीला मान्यता मिळाल्यास कर्करोग उपचार क्षेत्रात नवा अध्याय सुरू होणार हे नक्की.