Maoist Encounter In Jharkhand: झारखंडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश! चकमकीत 3 माओवादी ठार
Maoist Encounter In Jharkhand: झारखंडमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवले आहे. हजारीबाग जिल्ह्यातील पंतित्री जंगलात झालेल्या कारवाईत 3 माओवादी ठार झाले आहेत. यातील एका माओवाद्याच्या डोक्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सकाळी सुमारे 6 वाजता गोहर पोलीस स्टेशन हद्दीत सीपीआय (माओवादी)च्या सहदेव सोरेन पथकाशी सुरक्षा दलांची चकमक झाली. गोळीबारानंतर घटनास्थळावर सहदेव सोरेनसह इतर 2 माओवादींचे मृतदेह आढळले.
मृतांची ओळख खालील प्रमाणे आहे -
सहदेव सोरेन (केंद्रीय समिती सदस्य आणि 1 कोटी रुपयांचे बक्षीस)
रघुनाथ हेम्ब्रम (विशेष क्षेत्र समिती सदस्य, 25 लाख रुपयांचे बक्षीस)
वीरसेन गंजू (प्रादेशिक समिती सदस्य, 10 लाख रुपयांचे बक्षीस)
कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी 3 AK-47 रायफल जप्त केल्या असून जवानांना कोणतीही इजा झाली नाही. या ऑपरेशनमध्ये 209 कोब्रा बटालियन सहभागी होती. 2025 मध्ये या युनिटने नक्षलविरोधी कारवायांमध्ये मोठे यश मिळवत 20 कट्टर माओवादी ठार केले आहेत. यामध्ये 2 केंद्रीय समिती सदस्य, 2 बीजेएसएसी सदस्य, 4 ZCM, 2 SZCM, 3 ACM यांचा समावेश आहे. त्याशिवाय 3 नक्षलवाद्यांना अटकही करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरक्षा दलाने आतापर्यंतच्या कारवायांमध्ये 32 स्वयंचलित शस्त्रे, 345 किलो स्फोटके, 88 डेटोनेटर, 2500 जिवंत दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त केले आहे. तसेच 18 लपण्याची ठिकाणे व 39 बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.