काहीतरी मोठं घडणार...? भारत-पाक सीमेवर अलर्ट! लष्करप्रमुख उद्या श्रीनगरला भेट देणार
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 25 एप्रिल रोजी श्रीनगरला सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत. स्थानिक लष्करी तुकड्यांचे वरिष्ठ कमांडर त्यांना खोऱ्यात आणि नियंत्रण रेषेवर सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी उपाययोजनांबद्दल माहिती देतील. या भेटीदरम्यान 15 व्या कॉर्प्स कमांडर आणि राष्ट्रीय रायफल्सचे इतर फॉर्मेशन कमांडर्स उपस्थित राहतील.
दिल्लीत लष्करप्रमुखांची उच्चस्तरीय बैठक -
दरम्यान, मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण प्रमुख (सीडीएस), तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली.
हेही वाचा - पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानी नागरिकांना 4 दिवसांत सोडावा लागेल भारत; व्हिसा सेवा तात्काळ बंद
लष्कर प्रमुखांनी घेतली सुरक्षा परिस्थितीची माहिती -
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पहलगाम आणि संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची माहिती संरक्षणमंत्र्यांना दिली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.
हेही वाचा - सिंधू पाणी करार थांबवला तर 'युद्ध' मानू; पाकिस्तानचा भारताला इशारा
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातील नागरिकांनी पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसून पाकिस्तानवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. उद्या लष्करप्रमुखांचा श्रीनगर दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे आता भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला कसे प्रतिउत्तर देण्यासाठी कोणती रणनीती आखेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रत्येक भारतीयाचे लक्ष आता भारताच्या प्रतिउत्तरावर लागले आहे.