Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?
नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा (Mumbai Attack) मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याला अखेर भारतात आणले आहे. राणाला अमेरिकेतून एका विशेष विमानातून भारतात आणले गेले. पालम विमानतळार दाखल झाल्यानंतर राणाला कडेकोट बंदोबस्तात एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात आले. आता त्याच्यावरील आरोप न्यायालयात लवकरात लवकर सिद्ध व्हावा आणि त्याला फाशी देण्यात यावी, ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे. मात्र, खरोखरच तहव्वूर राणाला फाशी मिळणार का? जाणून घेऊ, प्रत्यर्पण केलेल्या गुन्हेगाराला कोणती शिक्षा देता येते..
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला भारतातच अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खटला चालवून त्याला फाशी देण्यात आली. मात्र, या हल्ल्याचा सूत्रधार आतापर्यंत भारताच्या हाती आला नव्हता. आता तहव्वूर राणाला भारतात आणल्यामुळे भारतीयांची या हल्ल्याविषयीची चीड पुन्हा एकदा जागृत झाली आहे. परंतु, राणा याला अमेरिकन सरकारने अमेरिकेत अटक केल्यामुळे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे लागणार आहे. या प्रकरणात भारताला आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पण कराराचे पालन करावे लागेल. याअंतर्गत राणाला मृत्युदंडाची शिक्षा देता येत नाही किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन खटला दाखल करता येत नाही. त्यामुळे नियमानुसार, अजमल कसाबप्रमाणे राणाला फाशी देता येणे शक्य नाही.
राणा याच्या प्रत्यर्पणाची मागणी करताना भारताने अमेरिकन न्यायालयात जे प्रकरण कागदपत्रांसह दाखल केले होते आणि त्याच्या आधारावर राणाला भारतात पाठवण्यात आले, केवळ त्यात नमूद खटलाच राणावर चालवता येईल, असा नियम आहे. भारतात राणावर अनेक खटले दाखल आहेत. तसेच, चौकशीदरम्यान आणखी माहिती समोर आल्यास त्यातून आणखी गुन्हेही समोर येऊ शकतात. मात्र, तेही प्रत्यक्ष खटल्यामध्ये जोडता येणार नाहीत. राणाविरुद्ध फक्त तोच खटला चालवला जाईल, जो प्रत्यार्पण न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सादर केला गेला असेल.
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न पुढे आणण्याच्या अटीवर सांगितले की, भारतही या प्रकरणात असे कोणतेही नवीन कलम जोडू शकत नाही, जे त्यांनी प्रत्यार्पण न्यायालयासमोर नमूद केलेले नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, नियमांनुसार, राणाला मुंबई हल्ल्याच्या आधारे भारतात आणण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फक्त मुंबई हल्ल्याचा खटला चालवला जाईल. जरी चौकशीदरम्यान त्याने भारतात केलेल्या इतर गुन्ह्यांची कबुली दिली तरी देखील त्याला मुंबई हल्ल्याशी संबंधित गुन्ह्यातच शिक्षा होईल. शिवाय, प्रत्यर्पणाच्या नियमांनुसार त्याला फाशी देता येणार नाही.
जामीन, पॅरोल काही मिळणार नाही या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राणा याला तुरुंगातून जामीन किंवा पॅरोल मिळणार नाही. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्याला तुरुंगातच राहावे लागणार असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले. तसेच, भारतीय न्यायालय त्याला कोणतीही शिक्षा देईल, ती त्याला तुरुंगात भोगावी लागेल. पण ती मृत्युदंड असू शकत नाही, हे देखील या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाल्यानंतर राणाला आयुष्यभर भारतीय तुरुंगात रहावे लागेल, असाच निघत आहे.
हेही वाचा - वादळी पावसाने घेतला ९० लोकांचा बळी, बिहार, यूपीसह 'या' राज्यात पावसाचा हाहाकार
राणाप्रमाणेच भारत सरकारच्या मागणीनुसार कुख्यात माफिया डॉन अबू सालेम याचेही प्रत्यर्पण करण्यात आले होते. त्या प्रकरणातही त्याला मृत्युदंड देता येणार नाही, हे स्पष्ट होते. शिवाय, त्याच्याविरुद्ध फक्त तेच खटले चालवले गेले जे भारतीय एजन्सींनी प्रत्यर्पणादरम्यान परदेशी न्यायालयाला सांगितले होते. अबू सालेम भारतात आल्यानंतर, मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत नवीन खटला दाखल केला. परंतु, नंतर अबू सालेमने न्यायालयात अपील केल्यामुळे मुंबई पोलिसांना तो खटला मागे घ्यावा लागला. अशाच पद्धतीने भारतीय न्यायालयाने राणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर, त्याला ती शिक्षा भोगावी लागेल.