गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची हत्या; वडिलांनीचं झाडल्या मुलीवर गोळ्या
गुरुग्राम: हरियाणातील गुरुग्राममध्ये गुरुवारी एका राज्यस्तरीय महिला टेनिस खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. महिला टेनिसपटूच्या वडिलांनी त्यांच्या परवानाधारक पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडून त्यांच्या मुलीची हत्या केली. मृत मुलीचे नाव राधिका यादव असे आहे. ती राज्यस्तरीय टेनिस खेळाडू होती. ही घटना टेनिस खेळाडूच्या घरातच घडली. पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या वडिलांना अटक केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास, 25 वर्षीय राधिकाच्या वडिलांनी त्यांच्या मुलीवर गोळीबार केला. टेनिस खेळाडू तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर 57 मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. तीन वेळा गोळ्या झाडल्यानंतर, राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा - दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिका अटकेत; शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
राधिकाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राधिका ही एक प्रसिद्ध राज्यस्तरीय खेळाडू होती. तिने अनेक पदके जिंकली होती. राधिका एक टेनिस अकादमी देखील चालवत होती. राधिकाच्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. गुरुग्राम सेक्टर 56 च्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी त्यांना माहिती मिळाली की 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येत वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.
हेही वाचा - 'या' कारणामुळे आरोपीने केला 12 वर्षीय मुलावर अमानुष मारहाण
रील बनवल्यामुळे वडिलांनी केली मुलीची हत्या?
दरम्यान, माध्यमातील वृत्तानुसार, राधिका यादव आणि तिच्या वडिलांमध्ये रील बनवण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केली. 23 मार्च 2000 रोजी जन्मलेल्या राधिकाचे डबल्स आयटीएफ रेटिंग 113 होते. ती बराच काळ आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या रँकिंगमध्ये टॉप-200 मध्ये राहिली. तथापी, आता राधिकाच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत.