उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू; महागाई, भ्रष्टाचारासह 'या' मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार
नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 21 जुलैपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ला -
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प यांचे विधान
दरम्यान, 7 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष रोखण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हापासून विरोधी पक्ष भारताच्या परराष्ट्र धोरणावर वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत. या कारवाईत भारताला झालेल्या नुकसानाची देखील विरोधी पक्षाकडून माहिती मागितली जात आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवला भेट देणार; महत्त्वाच्या करारांवर होणार चर्चा
अहमदाबाद विमा अपघात -
याशिवाय, अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर, अपघाताबाबत अनेक सिद्धांत समोर आले आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष विमान अपघाताची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अमित शाहांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले त्यात कोकाटेंचं नाव; खासदार राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट
बिहार मतदार यादी -
तथापी, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष सघन पुनर्विलोकनाच्या बाबतीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर आधीच प्रश्न उपस्थित केले आहेत. या अधिवेशनात ते पंतप्रधान मोदी आणि सरकारकडून उत्तरे मागतील.