'आज माझ्या पतीच्या आत्म्याला शांती मिळेल...'; ऑपरेशन सिंदूरवर शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: भारताने आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, भारतीय सैन्याने पाकिस्तानात लपलेल्या 9 दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने आता 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी (पाकिस्तानला) ज्या पद्धतीने प्रतिउत्तर दिलं त्यामुळे आमचा विश्वास अबाधित राहिला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. आज माझे पती कुठेही असले तरी त्यांना शांती मिळेल. ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकल्यानंतर माझ्या अश्रूंना बांध फुटला,' असंही शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने म्हटलं आहे.
दरम्यान, शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. या प्रत्युत्तरात्मक कारवाईबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. मुलाला गमावल्याचे दुःख त्यांच्या मनात अजूनही ताजे आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराच्या कारवाईने त्यांच्या मनाला दिलासा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - Operation Sindoor: जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक, पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याचे 10 कुटुंबीय ठार
संजय द्विवेदी यांनी या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे कौतुक केले. त्यांनी पंतप्रधान मोदींना याचे श्रेय दिले आणि त्यांचे आभार मानले. भारताने त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला, अशी प्रतिक्रिया संजय द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर दिली आहे.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूरची मीडिया ब्रीफिंग देणाऱ्या कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका कोण आहेत?
दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले -
भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर मोठे हवाई हल्ले केले. यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणांसह 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पीओकेमधील स्फोटांनंतर, नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला.