ऑपरेशन सिंदूरची मीडिया ब्रीफिंग देणाऱ्या कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका कोण आहेत?
नवी दिल्ली: भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक केला. यानंतर आज नवी दिल्ली येथे एक महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या ब्रीफिंगमध्ये, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन वरिष्ठ महिला लष्करी अधिकाऱ्यांनी देशाला या कारवाईची माहिती दिली. अशा मोठ्या लष्करी कारवाईवर दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्राला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऑपरेशन सिंदूरचा उद्देश -
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने 6-7 मे 2025 च्या रात्री 1:05 ते 1:30 दरम्यान ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके यांचा समावेश आहे.
कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?
गुजरातमधील वडोदरा येथे जन्मलेल्या कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यातील एक अनुभवी अधिकारी आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मोहिमांमध्ये भाग घेतला आहे आणि एक्सरसाइज फोर्स-18 चे नेतृत्व केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे आणि रणनीती याबद्दल सविस्तर माहिती दिली. कर्नल सोफिया म्हणाल्या, 'पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि नागरिकांची जीवितहानी होणार नाही याची खात्री करण्यात आली.'
हेही वाचा - Operation Sindoor Inside Story : PM मोदींनी मंजुरी दिली; पण हल्ल्याचा अंतिम निर्णय 'या' व्यक्तीने घेतला
विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत?
विंग कमांडर व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलाची एक कुशल हेलिकॉप्टर पायलट आहेत, तिने 2500 पेक्षा जास्त तास उड्डाण केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी राफेल विमानातून डागण्यात येणाऱ्या स्कॅल्प क्षेपणास्त्रांचा वापर यासारख्या ऑपरेशनच्या तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, 'आम्ही खूप संयम बाळगला आणि फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहलगाममधील शहीदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.' त्यांच्या स्पष्ट आणि प्रेरणादायी भाषणांनी देशवासीयांची मने जिंकली.
हेही वाचा - सर्व निमलष्करी दलांच्या सुट्या रद्द; आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट
महिला लष्करी अधिकाऱ्यांची ऐतिहासिक भूमिका -
दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या लष्करी कारवाईची माहिती देण्याची ही पहिलीच वेळ होती. कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांनी केवळ ऑपरेशनची तांत्रिक आणि धोरणात्मक माहितीच दिली नाही तर लक्ष्यित हल्ल्यांचे फुटेज आणि जमिनीवरील कारवाईचे तपशील देखील सादर केले.