Aadhaar Card Update: आधार कार्डवर नाव चुकलंय? UIDAI कडून मिळाली घरबसल्या दुरुस्तीची सुविधा; जाणून घ्या सोपी पद्धत
Aadhaar Card Update:आजच्या घडीला आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँक खाते उघडणे, शासकीय योजनांचा लाभ घेणे, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, पासपोर्टसारखी कागदपत्रे तयार करणे अशा जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक आवश्यक ठरतो. अशा वेळी तुमच्या आधार कार्डवरील नावात थोडीशीही चूक असेल, तर ती मोठी अडचण निर्माण करू शकते. पण काळजी करण्याची गरज नाही, कारण UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सोप्या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या घरबसल्या केवळ काही मिनिटांत नाव दुरुस्त करू शकता.
नाव चुकीचं असल्यास काय अडचणी येऊ शकतात?
आधार कार्डमध्ये नाव चुकल्यास शासकीय योजना मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय, पॅन-आधार लिंक, बँक खाते उघडणे, पासपोर्टसाठी अर्ज करणे, नोकरीसाठी कागदपत्रे सादर करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणूनच नावातील चुकीचं स्पेलिंग तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे.
जाणून घ्या दुरुस्तीची सोपी पद्धत
-सर्वप्रथम uidai.gov.in या UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
-‘माय आधार’ सेक्शनमध्ये जाऊन Update Aadhaar वर क्लिक करा.
-पुढे, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
-नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकून आलेल्या OTP ने लॉग इन करा.
-आता Demographic Data Update या पर्यायावर क्लिक करा.
-येथे तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता यापैकी जे अपडेट करायचे आहे ते निवडा.
-नाव दुरुस्त करताना योग्य स्पेलिंग नीट तपासून लिहा.
-सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती दोनदा पडताळून पाहा.
-आवश्यक पुरावे (जसे की पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट) अपलोड करा.
-शेवटी सबमिट केल्यावर तुम्हाला एक Service Request Number (SRN) मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही अपडेट स्टेटस ट्रॅक करू शकता.
नाव दुरुस्त करताना काय काळजी घ्यावी?
UIDAI च्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला आयुष्यात फक्त दोनदाच नाव बदलण्याची परवानगी असते. त्यामुळे दुरुस्त करताना पूर्ण काळजी घेणे अत्यावश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्यास विनंती नाकारली जाऊ शकते. त्यामुळे, योग्य स्पेलिंग आणि वैध पुरावे वापरणे अनिवार्य आहे.
फक्त काही मिनिटांत सोपी प्रक्रिया
ही प्रक्रिया पूर्ण करायला केवळ 2-3 मिनिटे लागतात. मोबाईल किंवा संगणकाद्वारे घरी बसून नाव दुरुस्त करता येते. यामुळे आधार सेवा केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहत नाही.
आधार कार्डमध्ये नावाची चूक असल्यास विलंब न करता त्वरित दुरुस्ती करणे हितावह आहे. ऑनलाइन उपलब्ध सुविधा वापरल्यास वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. योग्य कागदपत्रे तयार ठेवल्यास ही प्रक्रिया अगदी सहज पार पडते आणि भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतात.