मुंबईत ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज
मुंबई : विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि २५ हजारांहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईत एकूण ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ४,४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मतदान केंद्रे, अतिमहत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलिस आयुक्तांसह २० पोलिस उपायुक्त, ८३ सहायक पोलिस आयुक्त आणि दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलिस सज्ज
विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलिसांचे साध्या गणवेशात मतदान प्रक्रियेवर करडी नजर आहे.२६ केंद्रीय सुरक्षा दले आणि राज्य सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तीन दंगल नियंत्रण पथके तैनात केली आहेत. वाहतूक विभागामार्फत १४४ अधिकारी आणि एक हजाराहून अधिक अंमलदार बंदोबस्तावर ठेवले आहेत. चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले आहेत. संवेदनशील अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचे अधिक लक्ष असणार आहे.
नागरिकांनी आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मतदानाच्या दिवशी सर्व मुंबईकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच कोणत्याही मदतीसाठी आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १००/१०३/११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असेही पोलिसांनी सांगितले आहे.