अनिल देशमुखांवरील हल्ल्यावरुन आरोप - प्रत्यारोपांना उधाण
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार संपला आणि काही तासांनंतर काटोलमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली. या घटनेत देशमुख जखमी झाले. त्यांना तातडीने काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी लगेच उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. देशमुखांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणावरुन मविआ आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
अनिल देशमुख राजकीय विरोधकांकडून हल्ला झाल्याचा आरोप करत आहेत. तर अनिल देशमुखांवरील हल्ला संशयास्पद असल्याचा आरोप भाजपाचे परिणय फुके करत आहेत. गाडीवर चहूबाजूने दगडफेक झाली तर फक्त पुढील भागातल्या काचा कशा फुटल्या आणि एकटे अनिल देशमुख जखमी कसे झाले ? देशमुखांचा वाहन चालक सुखरुप आहे. पण त्याच्या पायाजवळ गाडीत दगड आढळले आहेत. हा प्रकार संशयास्पद आहे, असे परिणय फुके म्हणाले.
नेमके काय घडले ?
अनिल देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काटोलमधील उमेदवार सलील देशमुख यांचा प्रचार करुन नरखेड येथून काटोलला परतत होते, त्यावेळी दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दगडफेक करणारे हल्ला करुन जवळच्या शेतात पसार झाल्याची माहिती अनिल देशमुख आणि त्यांच्या सोबतच्यांनी पोलिसांना दिली. दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
अनिल देशमुख निवडणूक रिंगणाबाहेर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहणे पसंत केले आहे. त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. पण निवडणूक लढवणे टाळले. यंदा काटोलमधून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवत आहेत. सलील यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर अनिल शंकरराव देशमुख नावाची व्यक्ती निवडणूक लढवत आहे. पण ही व्यक्ती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची नातलग नसून नामसाधर्म्य असलेली काटोल मतदारसंघातील रहिवासी आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी
अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. 'हा हल्ला भाजपाने केला.... आम्ही देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करू... त्यांना परिणाम भोगावे लागतील...' अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया अनिल देशमुखांच्या समर्थकांनी दिल्या. अनिल देशमुखांच्या निवडक समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करुन हल्लेखोरांचा निषेध केला.