Anil Ambani : अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणी वाढल्या, सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
मुंबई: केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने अनिल अंबानी यांच्या आरसीएफएल आणि आरएचएफएल कंपन्या तसेच राणा कपूर यांच्या कुटुंबाशी संबंधित काही कंपन्यांबाबत न्यायालयात दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर बनावट आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
तपासात असे आढळले की, 2017 मध्ये यस बँकेने राणा कपूर यांच्या मंजुरीने अंबानी समूहाच्या कंपन्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या वेळी या कंपन्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्याचेही रेटिंग एजन्सींनी दाखवून दिले होते. मिळालेली रक्कम नंतर फेरफार करून विविध माध्यमांतून वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण व्यवहारातून सार्वजनिक निधीचा गैरवापर झाला. यातून राणा कपूर यांनी बँकेतील आपल्या पदाचा फायदा घेत अंबानी समूहाला मदत केली आणि बदल्यात त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांना कमी व्याजदरात कर्ज व गुंतवणूक मिळाली. या गैरव्यवहारामुळे यस बँकेला तब्बल 2700 कोटी रुपयांहून अधिक नुकसान सहन करावे लागले.
याशिवाय, तपासात असेही स्पष्ट झाले की, रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडने राणा कपूर यांच्या कुटुंबाच्या कंपनीत 1160 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचबरोबर या फंडने एडीए ग्रुपचे काही डिबेंचरही जवळपास 250 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर दोन्ही बाजूंच्या कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहारांवर कायदेशीर सुनावणी सुरू होणार असून पुढील काळात या प्रकरणाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.