कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
महाराष्ट्र्र : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काल दिनांक ५ डिसेंबर रोजी पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराकडे. शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य करण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराविषयी काय बोलले फडणवीस?
'राज्य सरकारचं ७,८,९ डिसेंबर रोजी अधिवेशन असेल. तसा प्रस्ताव राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पाठवला आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करु. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. खातेबदल जास्त काही होईल असं वाटत नाही. थोडेफार खाते बदल होईल. आघाडी सरकारमध्ये खातेवाटपाबाबत चर्चा करावीच लागते. त्या चर्चेनंतर खातेवाटप केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आता टेस्ट मॅच खेळायची आहे- देवेंद्र फडणवीस
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अडीच वर्षांत विकासाने गती घेतली आहे. या गतीला पुढेच नेऊ. त्या गतीने महाराष्ट्र पुढे जाईल. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आग्रही राहील. मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आहे. आता आमचे रोल बदलले असले तरी दिशा तीच राहील. आमचा समन्वय तोच राहील. कुठेही वेगळेपण पाहायला मिळणार नाही'.
'आम्ही तिघांनीही सगळे अधिकारी आहेत, मागच्या काळात पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि मी आलो. तेव्हा ५० ओव्हरची मॅच होती. त्यानंतर अजित पवार आले, त्यावेळी टी २० मॅच झाली. आता टेस्ट मॅच खेळायची आहे. आता नीट पायाभरणी करत राज्याला पुढे न्यायचं आहे. आता मी अधिकाऱ्यांना सांगितलं की यापुढे चांगली धोरण, निर्णय घेत राज्याची प्रगती करायची आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.