कर्मचार्‍यांसाठी भविष्य निधी खात्याची माहिती सहज म

EPFO Passbook Lite : पीएफ बॅलन्स तपासणे झाले आणखी सोपे; EPFO ने दिला नवा पर्याय

नवी दिल्ली : कर्मचार्‍यांसाठी भविष्य निधी खात्याची माहिती सहज मिळावी यासाठी कर्मचारी भविष्य निधी संस्था (EPFO) ने मोठा बदल केला आहे. EPFO 3.0 सुधारणा योजनेत आता ‘पासबुक लाइट’ ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे सदस्यांना फक्त एकदाच लॉगिन करून आपले योगदान, पैसे काढणे आणि चालू शिल्लक पाहता येणार आहे. यापूर्वी या माहितीसाठी वेगळ्या पासबुक पोर्टलवर प्रवेश करावा लागत असे, ज्यामुळे वेळखर्च व पासवर्डशी संबंधित अडचणी वाढत होत्या.

नोकरी बदलणाऱ्या कर्मचार्‍यांसाठीही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. पूर्वी पीएफ ट्रान्सफरसाठी Form 13 भरावे लागत असे आणि Annexure K प्रमाणपत्र केवळ कार्यालयांमध्येच उपलब्ध होते. आता मात्र EPFO पोर्टलवरून थेट Annexure K PDF डाउनलोड करता येणार असून सदस्यांना आपल्या ट्रान्सफरची स्थिती ऑनलाइन तपासता येईल. यामुळे पारदर्शकता वाढण्यासह वेळेची बचत होणार आहे.

हेही वाचा : Adani Group Stocks Climb : सेबीने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स वधारले

श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या मते, या बदलांमुळे विद्यमान तांत्रिक प्रणाली एकत्रित होऊन स्वतंत्र पोर्टलवरील भार कमी होईल आणि कार्यक्षमता वाढेल. जर एखाद्या सदस्याला तपशीलवार पासबुक पाहायचे असेल तर तो जुन्या पोर्टलचा वापर करू शकेल.

याशिवाय, EPFO ने सेटलमेंट आणि आगाऊ रकमेच्या मंजुरीतही सुधारणा केली आहे. अनेक प्रकरणांमध्ये मंजुरीची जबाबदारी आता थेट सहायक आयुक्त किंवा खालच्या दर्जाच्या अधिकार्‍यांकडे दिली आहे. यामुळे ट्रान्सफर, सेटलमेंट, आगाऊ रक्कम, परतावा आणि व्याज समायोजनासारखी प्रकरणे जलद मार्गी लागू शकतील. या सुधारणा उपक्रमामुळे लाखो पीएफ सदस्यांना ऑनलाइन सेवांचा अधिक सोयीस्कर व पारदर्शक अनुभव मिळणार आहे.