मैदानावर विजेसारखा धावणारा उसेन बोल्ट आता वयाच्या

Usain Bolt Struggles to Breathe : कधीकाळी जगातला सर्वात वेगवान धावपटू असलेल्या उसेन बोल्टला आता का झालंय पायऱ्या चढणंही अवघड?

Usain Bolt Struggles to Breathe : जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून प्रसिद्ध असलेला महान धावपटू उसेन बोल्ट (Usain Bolt) निवृत्तीनंतर एका वेगळ्याच समस्येचा सामना करत आहे. मैदानावर विजेसारखा धावणारा हा खेळाडू आता वयाच्या 39 व्या वर्षी साधा जिना चढतानाही दमतो. एका मुलाखतीत त्याने स्वतःच ही गोष्ट सांगितली आहे. आठ ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकणारा हा धावपटू 2017 मध्ये निवृत्त झाला.

उसेन बोल्टची बदललेली जीवनशैली एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोल्टने आपल्या सध्याच्या जीवनशैलीबद्दल सांगितले. तो म्हणाला, "सध्या मी फक्त मुलांना शाळेत सोडण्यासाठी वेळेवर उठतो. त्यानंतर काय करायचे, हे मूडवर अवलंबून असते. जर काही काम नसेल, तर मी आराम करतो. मूड चांगला असेल, तर कधीतरी वर्कआउट करतो. मी काही वेब सिरीज पाहतो आणि मुले घरी येईपर्यंत आराम करतो. नंतर त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवतो. ते त्रास देऊ लागले की बाहेर जातो. आजकाल मला लेगो (Lego) खेळायलाही आवडते."

शरीरावर दिसणारे परिणाम निवृत्तीनंतर ट्रॅकपासून दूर राहिल्याने बोल्टला त्याच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. तो म्हणाला की, त्याला आता पायऱ्या चढणेही कठीण जाते.

"मी आता फक्त जिममध्ये वर्कआउट करतो. मला जिम आवडत नाही. पण मला वाटते की, आता पुन्हा धावायला सुरुवात करावी लागेल. कारण, जेव्हा मी पायऱ्या चढतो तेव्हा मला दम लागतो," असे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, पूर्णपणे वर्कआउट सुरू केल्यानंतर त्याला श्वासावर काम करावे लागेल.

आपल्या मुलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना उसेन बोल्ट आता पाच वर्षांची मुलगी ऑलिंपिया लाइटनिंग आणि चार वर्षांचे जुळे मुलगे सेंट लिओ व थंडर यांचा वडील आहे. त्याच्या मुलांना त्याच्या स्टारडमबद्दल काहीच माहिती नाही. पण बोल्टला विश्वास आहे की, दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांचे मत बदलेल. बोल्ट आपल्या मुलांना बीजिंगमध्ये घेऊन जाण्याचा विचार करत आहे, कारण त्याच्या कारकिर्दीची खरी सुरुवात याच शहरातून झाली होती. तो मुलांना त्याच्या यशस्वी कारकीर्दीविषयी आणि तो मुलांना देत असलेल्या वारशाविषयी खूप काही सांगू इच्छितो.

हेही वाचा - China Masters 2025: थायलंडच्या खेळाडूवर विजय मिळवून पीव्ही सिंधूचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

उसेन बोल्टला असलेले शारीरिक त्रास उसेन बोल्टला सुरुवातीपासूनच स्कोलिओसिस (Scoliosis) नावाची व्याधी होती. यावर मात करून तो जगातील सर्वात वेगवान धावपटू बनला होता. या दुर्मीळ व्याधीमध्ये व्यक्तीच्या पाठीच्या कण्याला अनैसर्गिक बाक असतो. यामुळे त्याला प्रचंड पाठदुखी आणि स्नायूंच्या असंतुलनाचा त्रास होत होता. या कठीण आव्हानावर मात करून तो सर्वोत्तम धावपटू बनला. याव्यतिरिक्त 2024 मध्ये एका धर्मादाय सॉकर सामन्यामध्ये अॅचिलिस इंजरी (पायाचा स्नायू तुटला) झाली होती.

धावणे सोडल्यावर शरीरात काय बदल होतात? नियमित धावण्याचा व्यायाम हृदयाच्या आरोग्यासाठी आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय, धावल्याने कॅलरी बर्न होतात, स्नायू आणि हाडे मजबूत होतात, तसेच मानसिक आरोग्यही सुधारते. पण जेव्हा तुम्ही अचानक धावणे बंद करता, तेव्हा शरीरात अनेक बदल होतात.

फिटनेसची पातळी घटते: जर तुम्ही फक्त एक आठवडा धावणे सोडले, तरी तुमची फिटनेस पातळी कमी होऊ लागते. रक्तावर परिणाम: यामुळे रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे हृदयाचे कार्य बिघडते आणि स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्त कमी प्रमाणात मिळते. स्नायू निष्क्रिय होतात: निष्क्रियतेमुळे स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. यामुळे शरीर हळहळू साथ सोडत असल्यासारखे वाटते.

ब्रेकनंतर पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी उपाय जर तुम्ही व्यायामात ब्रेक घेतला असेल, तर घाबरू नका. तुम्ही काही प्रयत्नांनी पुन्हा जुनी फिटनेस मिळवू शकता. यासाठी खालील गोष्टींवर लक्ष द्या: कॅलरी बर्नवर लक्ष द्या: धावण्याव्यतिरिक्त तुम्ही चालणे, सायकलिंग आणि पोहण्यासारखे व्यायाम करू शकता. यामुळे तुमची शारीरिक हालचाल कायम राहील. नियमितता कायम ठेवा: व्यायामाची दिनचर्या पुन्हा सुरू करणे थोडे कठीण असले तरी, सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. वॉर्म-अप करा: कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी 5-10 मिनिटे वॉर्म-अप करा. यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि दुखापत होण्याचा धोका कमी होतो. हळूहळू तीव्रता वाढवा: एकाच वेळी जास्त धावू नका. हळूहळू तुमचा वेळ आणि अंतर वाढवा.

उसेन बोल्टची कथा आपल्याला हेच शिकवते की, शारीरिक हालचाल थांबल्यावर एक उत्तम ॲथलीटचीही शारीरिक सामान्य माणसापेक्षा अधिक खालावू शकते. त्यामुळे फिटनेस कायम ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. हेही वाचा - Neeraj Chopra Javelin Final Live Streaming: वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कधी आणि कुठे पाहायचा?