Navratri 2025 : 'या' तिथीमुळे यंदाची नवरात्र असणार दहा दिवसांची; जाणून घ्या
मुंबई: गणेशोत्सवाच्या आनंदानंतर आता देशभरातील भाविक शारदीय नवरात्रीच्या प्रतीक्षेत आहेत. देवीची आराधना, उपासना, जागर आणि दांडियाच्या तालावर नवरात्रीची रंगत प्रत्येकाला अनुभवायची असते. या वर्षीची शारदीय नवरात्री विशेष ठरणार आहे. कारण या वेळेस रावरात्रीचा उत्सव नऊ नव्हे तर तब्बल दहा दिवसांची असणार आहे.
कधी सुरू होणार नवरात्री?
हिंदू पंचंगानुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. मात्र, यंदा ही तिथी 22 सप्टेंबर 2025 रोजी येत असून त्यादिवशी देवीची स्थापना होईल. त्यानंतर, नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाईल, तर 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा साजरा होईल.
'या' कारणामुळे यंदाची नवरात्र ठरणार खास
साधारणपणे, नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसांचा असतो. पण या वर्षी तृतीया तिथी दोन दिवस राहणार आहे. 24 आणि 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आहे. त्यामुळे, एक दिवस जास्त जोडला जाईल आणि यंदा नवरात्रीचा उत्सव दहा दिवसांचा असेलय हा योग फारच दुर्मिळ मानला जातो. ज्योतिषाशास्त्रानुसार, तिथी वाढणे हे अतिशय शुभ मानले जाते. तिथी वाढली म्हणजे येणारा काळ सुख समृद्धी घेऊन येतो, अशी मान्यता आहे. यामुळे, देश आणि जगाच्या प्रगतीसाठी हा काळ चांगला ठरणार असल्याचे मानले जाते. धर्मशास्त्रातही तिथी वाढणे हा चांगले संकेत असल्याचे नमूद केले गेले आहे.
नवरात्रोत्सव खालीलप्रमाणे असेल
घटस्थापना: 22 सप्टेंबर 2025
खंडेनवमी: 1 ऑक्टोबर 2025
विजयादशमी आणि दसरा: 2 ऑक्टोबर 2025
नवरात्रीचे महत्त्व
नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. शैलपुत्रीपासून ते सिद्धीदात्रीपर्यंत प्रत्येक रुपाला वेगवेगळे महत्त्व आहे. या काळात भाविक उपवास करून देवीची आराधना करतात. या काळात भाविक उपवासाबरोबरच व्रत, जप, होम, हवन आणि देवीची भव्य आरास करतात. सोबतच, यादरम्यान जागर आणि देवीची आरतीही केली जाते.
नवरात्र तृतीया तिथी म्हणजे काय?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची तिथी म्हणजे नवरात्र तृतीया तिथी. तृतीया तिथीला देवीची चंद्रघंटा स्वरूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला विशेष 'रॉयल निळा' रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. 'तृतीया तिथी' हा दिवस दुर्गा मातेला समर्पित आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)