महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन
मुंबई : महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत कांदिवली पूर्व येथे करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे स्नानगृह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील भगिनींना स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार असून, यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील. मंत्री लोढा म्हणाले, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते, हे आम्ही जाणतो. तो त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आले. या बसमध्ये एकूण 5 स्नानगृहे आहेत, शॉवर आहेत, 2100 लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी 2 ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा
पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी यासाठी या स्नानगृहात महिला कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत.