इंस्टाग्राम रील्स, टोमणे, टेनिस अकादमी...! टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवीन खुलासे
गुरुग्राम: हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार यांनी राज्य चॅम्पियन टेनिस खेळाडू हत्याकांडाची माहिती माध्यमांना दिली. त्यांनी सांगितले की, 25 वर्षीय राधिकाची तिचे वडील दीपक यादव यांनी 3 गोळ्या झाडून हत्या केली. न्यायालयाने आरोपी दीपकला पोलिस कोठडीत पाठवले आहे, तर मृत राधिकाच्या आईने पोलिसांना जबाब देण्यास नकार दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी दीपक यादव त्याच्या कुटुंबासह गुरुग्रामधील सेक्टर 57 मध्ये राहत होता. नियंत्रण कक्षाला एका घरात गोळ्या झाडल्याचा फोन आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी मुलीला रुग्णालयात नेले. मृत राधिकाच्या काकांनी तिचे वडील दीपक यादवने मुलीची हत्या केल्याचे सांगितले. काकांच्या तक्रारीवरून मृत दीपक यादववर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक यादवविरुद्ध कलम 103(1) बीएनएस खून आणि कलम 27(3), 54-1959 शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राधिका खून प्रकरणात मोठे खुलासे -
आरोपी दीपक यादवने मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले परवानाधारक रिव्हॉल्व्हर देखील जप्त केले आहे. दीपकने स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असलेल्या राधिकाच्या पाठीत परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून 3 गोळ्या झाडल्या. चौकशीदरम्यान आरोपी दीपकने स्वतः त्याची मुलगी राधिकाला मारण्याचे कारण सांगितले.
लोकांच्या टोमण्याला कंटाळून केली मुलीची हत्या -
दीपकने सांगितले की राधिका राज्य विजेती होती, परंतु एका स्पर्धेत खांद्याला दुखापत झाल्यामुळे तिने टेनिस खेळणे बंद केले. खेळ सोडल्यानंतर तिने टेनिस अकादमी उघडली होती, ज्यातून खूप पैसे मिळत होते, परंतु लोक म्हणायचे की तो त्याच्या मुलीच्या कमाईवर जगत आहे. लोकांचे टोमणे ऐकून तो अस्वस्थ होत होता. त्याने राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितले, पण तिला हे मान्य नव्हते. टोमण्यांना कंटाळून त्याने राधिकाची हत्या केली.
हेही वाचा - गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची हत्या; वडिलांनीचं झाडल्या मुलीवर गोळ्या
राधिकाच्या वडिलांनी सांगितले की, लोकांच्या टोमण्यांना कंटाळून तो राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगत असे. गुरुवारीही कोणीतरी त्याला मुलीवरून टोमणा मारला. त्यामुळे त्याने घरी आल्यानंतर राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितले, पण राधिका वाद घालू लागली. ती म्हणू लागली की तिला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. त्यानंतर दिपकने राधिकावर गोळी झाडली.
हेही वाचा - दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिका अटकेत; शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
इंस्टाग्रामवर रील्स बनवायची राधिका -
तथापी, दीपकने पोलिसांना सांगितले की, राधिका ही ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) ची नोंदणीकृत खेळाडू होती. एआयटीएच्या 18 वर्षांखालील मुलींच्या गटात राधिका 75 व्या क्रमांकावर होती. एआयटीएच्या टॉप-100 खेळाडूंमध्ये राधिका हरियाणातील 4 खेळाडूंपैकी एक होती, परंतु टेनिस अकादमी उघडल्यानंतर ती बदलली. ती दररोज इंस्टाग्रामवर रील्स बनवून अपलोड करायची. लोक तिचे रील्स पाहून चेष्टा करायचे. या सर्व घटनांना संतापून त्याने मुलीची हत्या केली.