'लाजिरवाणी लबाडी..!' प्रियांका गांधींनी इस्रायलवर केलेल्या 'गाझा नरसंहाराच्या आरोपा'ला इस्रायली राजदूतांचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली : काँग्रेसच्या वायनाड येथील खासदार प्रियांका गांधी यांनी गाझामध्ये इस्रायलने केलेल्या बॉम्बस्फोटावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी इस्रायलवर गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. यावर इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी उत्तर दिले की, आम्ही हमासचे 25,000 दहशतवादी मारले आणि नागरिकांचा मृत्यू हा हमासच्या रणनीतींचा परिणाम आहे.
प्रियांका गांधी यांनी एक्सवरती आकड्यांसह पोस्ट करत इस्रायलने लहान मुलांसह निष्पाप नागरिकांचे एकूण 60 हजारहून अधिक बळी घेतले आहेत, असा आरोप केला आहे. प्रियंका गांधी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "इस्रायल नरसंहार करत आहे. त्यांनी 18,430 लहान मुलांसह 60 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. शेकडो लोकांना उपाशी राहण्यास भाग पाडले आहे, ज्यात अनेक मुले आहेत आणि आताही लाखो लोकांना उपासमारीच्या टांगत्या तलावारीखाली ठेवले आहे."
हेही वाचा - ट्रम्पना धक्का? एकीकडे अमेरिकेच्या टॅरिफ धमक्या सुरूच; भारत या श्रीमंत देशासोबत करणार 10 मोठे करार
त्या पुढे म्हणाल्या की, मौन आणि निष्क्रियतेद्वारे या गुन्ह्यांना चालना देणे हा देखील एक गुन्हा आहे. इस्रायल पॅलेस्टाईनच्या नागरिकांचे हे हत्याकांड घडवून आणत असताना भारत सरकार गप्प आहे, हे लज्जास्पद आहे.
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिक मारले गेले आहेत. इस्रायली सैन्याने संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर वाद वाढत आहेत. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की त्यांनी 18,430 मुलांसह 60 हजारांहून अधिक लोक मारले आहेत.
प्रियांका यांच्या आरोपांना इस्रायलचे प्रत्युत्तर... इस्रायलचे भारतातील राजदूत रेऊव्हेन अझर यांनी प्रियंका गांधींच्या आरोपांना कडक भाषेत उत्तर दिले आहे. "तुमचे लबाडीने केलेले वर्णन लज्जास्पद आहे. इस्रायलने हमासच्या 25 हजार दहशतवाद्यांना मारले आहे. मानवी जीवनाचे मोठे नुकसान हे हमासच्या घृणास्पद धोरणांचे परिणाम आहेत. जसे की, नागरिकांच्या मागे लपणे, मदत किंवा निर्वासन कामगारांवर गोळीबार करणे आणि रॉकेट डागणे," असे एक्स पोस्टद्वारे प्रत्युत्तर देताना ते म्हणाले.
रेऊव्हेन अझर यांनी असेही म्हटले आहे की, इस्रायलने गाझामध्ये 20 लाख टन अन्नपदार्थ पाठवले. परंतु, हमासने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सामान्य लोकांची उपासमार झाली. त्यांनी असाही दावा केला की, गेल्या 50 वर्षांत गाझाची लोकसंख्या 450 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तिथे नरसंहाराचा प्रश्नच उद्भवत नाही. हमासच्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नका.
गाझा युद्धाबद्दलचे हे वक्तव्य दोन्ही बाजूंमधील खूप मोठी वैचारिक आणि राजकीय दरी दर्शवते. एकीकडे, प्रियंका गांधी याला मानवतेविरुद्धचा गुन्हा आणि नरसंहार म्हणत आहेत. तर, दुसरीकडे इस्रायल दावा करते की ते हमासच्या दहशतवादाविरुद्ध लढत आहेत आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - Trump Tariff: भारताच्या कापड निर्यातीवर ट्रम्प टॅरिफचे सावट; उत्पादन इतर देशांत हलवले जाऊ शकते
याशिवाय, X वरील दुसऱ्या पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी गाझामध्ये नुकत्याच बळी पडलेल्या अल जझीराच्या पाच पत्रकारांच्या हत्येचाही निषेध केला आहे. त्यांनी ही निर्घृण गुन्हा असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी इस्रायलवर "हिंसा आणि द्वेष" यांचा वापर करून "सत्याचे तोंड बंद" करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
अल जझीराच्या मीडिया नेटवर्कनुसार, गाझा शहरातील पत्रकारांच्या तंबूवर इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे पत्रकार अनस अल-शरीफ आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रियंका गांधी बऱ्याच काळापासून गाझामधील इस्रायलच्या कृतींविरुद्ध आवाज उठवत आहेत आणि पॅलेस्टिनी लोकांसोबत एकता व्यक्त करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने रविवारी पत्रकारांच्या तंबूवर झालेल्या हवाई हल्ल्याचा सोमवारी निषेध केला. त्यांनी, हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले.