वाहतूक पोलिसांचा दणका – २ लाख २४ हजारांचा दंड वसूल

जळगावमध्ये हेल्मेट न घातल्यास कठोर कारवाई – पहिल्याच दिवशी २४४ दुचाकीस्वार दंडित!

Jalgaon Helmet Rule Strict Enforcement

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर हेल्मेट सक्ती करून त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. जळगाव वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या २४४ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये २० जणांनी रोख दंड भरला, तर उर्वरित २२४ जणांकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाहतूक पोलिसांनी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये कारवाई केली. शिवकॉलनी, आयटीआयसमोर, आकाशवाणी चौक, राष्ट्रवादी कार्यालयासमोर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रत्येकी १,००० रुपये दंड आकारला गेला. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकूण २ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

👉👉 हे देखील वाचा : नाशिक पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार - नीलम गोऱ्हे

जळगाव वाहतूक विभागाने सांगितले आहे की, पहिल्यांदा विनाहेल्मेट आढळल्यास १,००० रुपये दंड, तर पुन्हा त्याच व्यक्तीला विनाहेल्मेट आढळल्यास १,५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच ट्रिपल सीट किंवा अन्य वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

सोमवारी करण्यात आलेल्या मोहिमेत ५२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ट्रिपल सीट आणि अन्य वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा समावेश होता. या कारवाईतून ४३,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल." जळगावमध्ये वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.