Julia Stewart Success Story: अपमानाचा बदला ! कंपनीच विकत घेतली आणि जुन्या बॉसला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई: सध्या ज्युलिया स्टीवर्ट नावाच्या यशस्वी उद्योजिकेची गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ज्युलिया स्टीवर्ट या उद्योजिकेने आपल्या कर्तृत्वाने आणि धाडसाने सर्वांना धक्का दिला आहे. ज्या कंपनीने तिला सीईओ पद नाकारले तीच कंपनी तिने विकत घेतली आहे. असे करत तिने आपल्या जुन्या बॉसला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम केले आहे. ही बाब नुकत्याच एका पॉडकास्टमधून समोर आली आहे.
ज्युलिया स्टीवर्ट या अॅपलबाय (Applebees) नावाच्या कंपनीच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी कंपनीला फायदा मिळवून दिल्यास त्यांना सीईओ पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी त्यांनी तीन वर्षे अथक प्रयत्न केले. ज्युलिया यांनी एक ग्रुप तयार करुन रणनीती आखली आणि कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. यानंतर त्यांनी सीईओ पदाची मागणी केली, तेव्हा त्यांना नकार देण्यात आला. कारण विचारले असता बॉसकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. नाराज झालेल्या ज्युलियाने राजीनामा दिला.
एवढ्यावरच ज्युलिया हार मानली नाही. त्यांनी आयएचओपी (IHOP) नावाच्या कंपनीत प्रवेश केला आणि तिथेही आपले कर्तृत्व सिद्ध केले. दरम्यान त्यांना कळले की 'अॅपलबाय' विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ज्युलियाने ‘अॅपलबाय’ 2.3 अब्ज डॉलरला विकत घेण्यास प्रवृत्त केले. व्यावसायिक करार पूर्ण होताच त्यांनी आपल्या आधीच्या बॉसला फोन करून सांगितले की आता तुमची कंपनीत गरज नाही. ज्युलियाची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.