उड्डाणपुलावरून पाडला नोटांचा पाऊस, पैसे पकडायला लोक धावले; चमत्कारिक प्रकाराचं कारण जाणून डोक्याला हात लावाल..
Kanpur Viral VIDEO : समाजमाध्यमांवर जास्तीत जास्त लाइक्स मिळावेत, व्ह्यूज व सब्स्क्रायबर्स मिळावेत, यासाठी सध्या लोक जी धडपड आणि कसरत करत आहेत, त्याला हुशारी म्हणावे की, वेडपणा म्हणावे, ते कळेनासे झाले आहे. उत्तर प्रदेशमधील एका युट्युबरने असाच प्रकार केला आहे. ज्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कानपूरमधील एका युट्यूबरने उड्डाणपुलावर उभा राहून नोटांचा वर्षाव केला.
कानपूरमधील चकेरी येथे ही घटना आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंर या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन युट्यूबरला ताब्यात घेतलं आहे.
जाणून घेऊ नेमकं काय घडलं..
अचानकपणे उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर नोटा पडू लागल्या. सुरुवातीला या नोटा कुठून येतायत हे लक्षात न आल्यामुळे लोक चक्रावले. मात्र, लगेचच त्यातील बहुतेकजण नोटा पाहून त्या पकडण्यासाठी धावले. उडणारे पैसे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या सर्व नोटा 200 रुपयांच्या होत्या.
हल्ली कॉन्टेंट क्रिएटर्स या गोंडस नावाखाली लोक वाट्टेल ते करताना दिसतात. अनेकजण वागण्यात किंवा बोलण्यात पातळी सोडतात, तर काहीजण जीवघेणी स्टंटबाजी देखील करतात. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की एक व्यक्ती उड्डाणपुलावर उभे राहून नोटा उडवत आहे. या नोटा उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर पडत आहेत आणि लोक त्या नोटा जमा करण्यासाठी एकच गर्दी करतायत. समाजमाध्यमांवर या तरुणाचं नाव जैद हिंदुस्तानी असं दिसत आहे. या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाला त्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचा होता. हा वाढदिवस कायम लक्षात राहील, असं काहीतरी करावं म्हणून त्याने हा प्रताप केला. यासाठी त्याने 50 हजार रुपयांची खैरात केली. त्याने उड्डाणपुलावर उभे राहून 200 रुपयांच्या नोटा उधळल्या. आता या व्यक्तीला दानशूर म्हणावे की, चक्रम म्हणावे, हा प्रश्नच आहे.
हा तरुण पैसे उधळत असताना त्याचे काही साथीदारही उड्डाणपुलावर उभे होते. त्यांनी देखील काही पैसे उधळले. हे तरुण पैसे उधळत असताना उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या लोकांनी मोठा गोंधळ केला. काही लोक पैसे गोळा करत होते, तर काहीजण या घटनेचा व्हिडीओ चित्रित करत होते.
यूट्यूबर पोलिसांच्या ताब्यात 'एकजण उड्डाणपुलावरून नोटा उधळतोय आणि दुसऱ्या बाजूला लोक पैसे गोळा करताहेत,' या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी या युट्यूबरचा शोध सुरू केला. पोलीस म्हणाले, 'सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे नोटा उधळणे कायद्याने गुन्हा आहे. कारण, यामुळे वाहतूक प्रभावित होते. अपघात होण्याची, लोकांमध्ये हाणामारी, चेंगराचेंगरी होण्याची देखील शक्यता असते. यामुळे मोठी दुर्घटना देखील घडू शकते. कानपूर पोलिसांनी या घटनेची दखल घेत सदर व्यक्तीस ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.'
हेही वाचा - आईची मजबूरी की निर्दयता? शिर्डीतील घटनेमागील हृदयद्रावक सत्य