Sada Sarvankar : मी आमदार नसतानाही मला 20 कोटींचा.. सदा सरवणकरांच्या विधानामुळे खळबळ; निधी वाटपावरून महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, माजी आमदार सदा सरवणकर यांनी एका वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना सरवणकर यांनी असा दावा केला की, सध्याच्या आमदारांना फक्त 2 कोटी रुपयांचा निधी मिळतो. पण मी आमदार नसतानाही मला तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुती सरकारवर निधी वाटपात भेदभाव केल्याचे आरोप पुन्हा एकदा जोर धरत आहेत.
हेही वाचा - Nitin Gadkari: 'आरक्षण न मिळणं हेच वरदान' आरक्षण मुद्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत
सरवणकर यांचे विधान दादर-माहीम परिसरात आयोजित एका कार्यक्रमात सरवणकर म्हणाले, “मी जरी आता आमदार नसलो तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. याच पाठिंब्यामुळे मला अनेक विकासकामे करता येत आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले, "मी आमदार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरीही माझी कामे सुरू आहेत. विद्यमान आमदारांना विकासकामांसाठी 2 कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी कामे केली आहेत," असे सरवणकर म्हणाले. मात्र, या विधानामुळे सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना मुद्दा मिळाला आहे.
हेही वाचा - Laxman Hake: ओबीसी आंदोलन नेते लक्ष्मण हाके यांचा कथित ऑडिओ कॉल व्हायरल
राजकीय वर्तुळात चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून महायुती सरकारवर निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जात होता. आता सत्ताधारी गटातील एका नेत्यानेच केलेल्या या विधानामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. सदा सरवणकर यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.