माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा जाहीर
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे. त्यामुळे 27 डिसेंबर रोजी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. केंद्र सरकाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ सात दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केला.
राष्ट्रीय शोकाची घोषणा केल्यावर, शोकाच्या काळात भारतभर सर्व इमारतींवर, जिथे राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकवला जातो, तिथे तो अर्धा फडकवला जाईल. तसेच, शोकाच्या दिवसांमध्ये कोणत्याही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
काँग्रेस पक्षाने देखील जाहीर केले आहे की पक्षाचे सर्व शासकीय कार्यक्रम, त्यात फाउंडेशन डे साजरा करण्यासह, पुढील सात दिवसांसाठी रद्द केले जातील आणि ३ जानेवारीपासून पुन्हा सुरू होतील. पक्षाचा ध्वजही अर्धा फडकवला जाईल.
रात्री 8 वाजता त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री 9:51 वाजता त्यांचे निधन झाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांची श्रद्धांजली अर्पण करत 'माझे आदर्श हरपल्याची' भावना व्यक्त केली.
डॉ. मनमोहन सिंग यांचे राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते आणि 2003 ते 2014 दरम्यान त्यांनी पंतप्रधान म्हणूनकारभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. ते एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ होते, ज्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर होती.
डॉ. मनमोहन सिंग यांचा शैक्षणिक प्रवासही प्रभावी होता. त्यांनी पंजाब विद्यापीठातून 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली, आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉ. फिलची पदवी प्राप्त केली.