भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यापूर्वी मोदी सरकारने एलोन मस्कच्या Starlink कंपनीसमोर ठेवल्या 'या' अटी
Satellite Internet Service: अमेरिकन उद्योजक एलोन मस्क यांची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. एअरटेल आणि जिओ कंपनीने यासाठी स्टारलिंक सोबत करार देखील केला आहे. परंतु, भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारने स्टारलिंकसमोर काही अटी ठेवल्या आहेत. शटडाऊन नियंत्रित करण्यासाठी देशातच एक नियंत्रण केंद्र स्थापन करावे अशी सरकारची मागणी आहे. याचा अर्थ जर ही सेवा कधी बंद करावी लागली तर तिचे नियंत्रण केंद्र फक्त भारतातच असले पाहिजे. तसेच, डेटा सुरक्षेसाठी, सुरक्षा एजन्सींना कॉल इंटरसेप्ट करण्याची म्हणजेच डेटाचे निरीक्षण करण्याची सुविधा कंपनीने द्यावी, अशी देखील अट केंद्र सरकारने स्टारलिंकसमोर ठेवली आहे.
सरकारने स्टारलिंकला घातल्या अटी -
याशिवाय, सरकारने म्हटले आहे की, उपग्रहाद्वारे परदेशात केलेले कॉल थेट फॉरवर्ड करण्याऐवजी, स्टारलिंकला प्रथम ते भारतात बांधलेल्या स्टारलिंक गेटवेवर आणावे लागतील. त्यानंतर कॉल टेलिकॉम चॅनेलद्वारे परदेशात पाठवला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दोन अटी देशातील टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (VI) वर आधीच लागू आहेत.
परवाना मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात -
रिपोर्टनुसार, स्टारलिंकच्या उपग्रह संप्रेषण परवान्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. भारतात इंटरनेट सेवांसाठी मार्केटिंग आणि नेटवर्क विस्तारासाठी कंपनी जिओ आणि एअरटेलसोबत करार करत आहे. देशाच्या कोणत्याही भागात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपर्क सेवा तात्काळ बंद करण्यासाठी नियंत्रण केंद्र आवश्यक आहे. यामध्ये उपग्रह सेवांचाही समावेश आहे. त्यामुळे, भारतात स्टारलिंकचे नियंत्रण केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिओ आणि एअरटेलचा स्टारलिंकसोबत करार -
भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी, देशातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या जिओ आणि एअरटेल यांनी एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, स्पेसएक्स आणि एअरटेल व्यवसाय, शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम भागात स्टारलिंक सेवा प्रदान करण्यासाठी एकत्र काम करतील.