Mumbai Best Bus Accident : इलेक्ट्रिक बस कारवर आदळली, मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून मृत्यू
मुंबई : सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. यात पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं रस्त्यावर उभा असणाऱ्या कारला मागून जोराची धडक दिली. यात बस आणि कारच्या मधे असणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी हादरवणारं दृश्य होतं.
मंगळवारी सकाळी बेस्टच्या 105 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस विजय वल्लभ चौकाकडून कमला नेहरू पार्ककडे जात असताना सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हा अपघात घडला. बस घटनास्थळी पोहचल्यावर अचानक मोठा आवाज झाल्याने बस चालक बसमधून उतरला आणि पाहिल्यावर महिलेला डोक्याला मार लागला होता. डाव्या बाजूला असलेल्या पार्किंग केलेल्या गाडीचेही नुकसान झाले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अथितीगृहासमोरून निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारवर आदळली. घटना घडली तेव्हा ही महिला कारच्या शेजारी उभी होती. बस महिलेच्या अंगावर आल्यानं महिला बस आणि कारच्या मधे चिरडली गेली. बस आणि मोटारगाडीमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्यांनी दिले. पोलिसांनी अपघातानंतर तात्काळ स्वतःच्या मोबाइल व्हॅनमधून महिलेला जे. जे. रुग्णालयात नेले.
मॉर्निंग वॉक करताना अपघातात मृत्यू महिला दक्षिण मुंबईतली रहिवासी आहे. ती मॉर्निंग वॉकसाठी आली होती. तिचं वय 65-70 च्या दरम्यान होतं, असं सांगण्यात येतंय. दोन वाहनांच्या मधे चिरडल्यानंतर महिलेच्या शरिराचा खालचा भाग फिरला असल्याचं दिसतंय. इलेक्ट्रिक बस आणि कारच्या मधे चिरडून महिलेच्या शरिराच्या काही भागाचा चुराडा झाला. या महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. पण तिचा आधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत महिलेचे नाव नीता शहा असून त्या रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंग येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तेथील उपस्थित डॉक्टर स्नेहल जाधव यांनी महिलेला मृत घोषित केले. ही इलेक्ट्रिक बस ईव्ही ट्रान्स कंपनीची भाडे तत्वावरील बस असून या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.