Narali Purnima 2025 : नारळी पौर्णिमेची पूजा कशी केली जाते? जाणून घ्या, या दिवसाचे महत्त्व
Narali Purnima 2025: समुद्र आणि कोळीबांधवांचे नाते अतिशय खास आहे. समुद्र हा कोळी बांधवांचा अन्नदाता आणि देव आहे. या समुद्राचे आणि वरुणदेवाचे म्हणजेच, पावसाचे एकमेकांशी घनिष्ठ नाते आहे. या समुद्राला आणि वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी कोळीबांधव श्रावण महिन्यातील पौर्णिमेला समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात. नारळ अर्पण करताना तो समुद्रात टाकला जात नाही. तर, अत्यंत आदरपूर्वक अर्पण केला जातो. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
नारळी पौर्णिमा सणामागे एक सुंदर धार्मिक आणि नैसर्गिक संकल्पना दडलेली आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे मासेमारी पूर्णपणे थांबलेली असते. या काळात समुद्राला शांत करण्यासाठी आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पौर्णिमा साजरी केली जाते. नारळ हे शुभ आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे या दिवशी नारळ अर्पण करून वरुणदेवतेला प्रसन्न केले जाते आणि पुढचे वर्षभर मासेमारी सुरक्षित आणि यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाते. हा सण निसर्गाबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करतो.
श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी सणानंतर नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे, नारळी पौर्णिमेची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊया...
नारळीपौर्णिमा उत्सव नारळीपौर्णिमा हा समुद्र व जलदेवतेची पूजा करण्याचा दिवस आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. कोळी समाजासाठी खास महत्त्वाचा दिवस आहे. सणाचा उत्सवमय आनंद नारळीपौर्णिमेला समुद्रकिनाऱ्यावर विविध कार्यक्रम, नृत्य व पारंपरिक गीते होतात. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्सवमय असते. हे एक सांस्कृतिक पर्व आहे.
नारळी पौर्णिमा 2025 तिथी (Narali Pornima 2025 Date And Time) श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरू होणार असून पौर्णिमेची समाप्ती शनिवारी 9 ऑगस्ट दुपारी 1.24 वाजता होईल.
नारळी पौर्णिमा शुभ मुहूर्त (Narali Pornima 2025 Shubh Muhurat) सकाळी 7.15 वाजेपासून ते 11.00 वाजेपर्यंत असेल.दुपारी 12.30 वाजेपासून ते दुपारी 13.30 वाजेपर्यंत असेल. रात्री 9 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल.
नारळी पौर्णिमेचे महत्त्व (Narali Pornima 2025 Significance) नारळी पौर्णिमा मासेमारी करणाऱ्या समुदायांमधील लोकप्रिय सण आहे. हा सण ऋतूशी संबंधित आहे. श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे मासेमारी करणं शक्य होत नाही. पावसामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी समुद्रात विधीवत श्रीफळ अर्पण करण्याची परंपरा आहे. नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारी करण्यास सुरुवात करतात. मान्यतेनुसार मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी नारळी पौर्णिमा सणाच्या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. या दिवशी लोक पारंपरिक पोशाख परिधान करुन गाणी गाऊन नाचून उत्सव साजरा करतात. समुद्रामध्ये नारळ फेकू नये तर अतिशय हळूवारपणे नारळ अर्पण करावा. समुद्रावर उत्पन्न अवलंबून असलेले लोक या सणानंतर मासेमारी करण्यास सुरुवात करतात.
श्रीफळ म्हणजेच, नारळाचे महत्त्व नारळ हे शुभ फळ मानले जाते, म्हणून त्यास श्रीफळ म्हणतात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ वाढवून केली जाते तसेच प्रत्येक पूजेमध्ये देवाला श्रीफळ अर्पण केले जाते. नारळ अर्पण केल्याने समृद्धी, संरक्षण आणि देवतेचे आशीर्वाद मिळतात, असा विश्वास आहे.
समुद्राची पूजा, वरुण देवतेची पूजा या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते. यामागील उद्देश म्हणजे समुद्रात मासेमारी करताना सुरक्षितता लाभावी, अशी श्रद्धा आहे. तसेच, या दिवशी वरुण देवतेची पूजा केली जाते. वरुणदेव जलतत्त्वाचे अधिपती मानले जातात. यांना प्रसन्न करण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण केला जातो.
कोळी समाजाचा सण कोळी बांधव नारळीपौर्णिमेला समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात. यानंतर मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात होते. हा त्यांच्यासाठी नववर्षासारखा असतो.
हेही वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तीन गाठी बांधाव्यात; जाणून घ्या काय आहे श्रद्धा
रक्षाबंधन नारळीपौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनही साजरे होते. बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. यामुळे या दिवसाला दुहेरी महत्त्व आहे.
ब्राह्मण यज्ञोपवीत पूजा या दिवशी अनेक ब्राह्मण यज्ञोपवित (जानवे) बदलतात. या विधीस ‘ऋषितर्पण’ म्हणतात. हे धार्मिक शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते.
सणाचा उत्सवमय आनंद नारळीपौर्णिमेला समुद्रकिनाऱ्यावर विविध कार्यक्रम, नृत्य व पारंपरिक गीते होतात. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्सवमय असते. हे एक सांस्कृतिक पर्व आहे.
नारळी पौर्णिमेचा सण हा कोळी बांधवांसाठी केवळ एक धार्मिक विधी नसून तो त्यांच्या जीवनशैलीचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पावसाळा संपल्यावर मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होण्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी कोळी बांधव आपल्या रंगीबेरंगी बोटी सजवून समुद्राची पूजा करतात, त्याला नारळ अर्पण करतात आणि मग समुद्रात छोटासा प्रवास करून नवीन हंगामाची सुरुवात करतात. यानिमित्ताने नारळी भात आणि नारळाच्या करंज्यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा खास नैवेद्य बनवून तो एकमेकांमध्ये वाटला जातो.
(Disclaimer: ही बातमी धार्मिक रीती-रिवाज आणि ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)