रक्षाबंधनाचा नवा विक्रम! 15 हजार विद्यार्थिनींनी खान सरांना बांधली राखी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Khan Sir Raksha Bandhan: देशातील सुप्रसिद्ध शिक्षक खान सर यांचा रक्षाबंधन सण यंदा विशेष ठरला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली, पण यावेळी हा आकडा तब्बल 15 हजारांपर्यंत पोहोचला. या मोठ्या गर्दीमुळे यावर्षीचा कार्यक्रम त्यांच्या शिकवणी वर्गाऐवजी स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला. सकाळी सुरू झालेला हा उपक्रम दुपारपर्यंत सुरू राहिला. कार्यक्रमादरम्यान खान सरांच्या हातावर राख्यांचा एवढा मोठा गठ्ठा होता की त्यांनी विनोदी शैलीत म्हटलं, 'डॉक्टरला बोलवा, हातातील रक्त थांबले आहे.' त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात पुढे सांगितले, 15 हजारांहून अधिक राख्या बांधल्या गेल्या आहेत, पण मी उठू शकत नाही. या कलियुगात, आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या राख्या बांधण्यात आल्या.
विद्यार्थिनींसाठी खास मेजवानी -
खान सरांनी सर्व बहिणींसाठी 156 प्रकारचे पदार्थ तयार करून विशेष जेवणाची सोय केली होती. राखी बांधल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला. अनेक विद्यार्थिनींनी सांगितले की, त्या खान सरांना केवळ उत्तम शिक्षक नव्हे तर कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणारा सर्वोत्तम भाऊ मानतात.
हेही वाचा - Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी काढणे शुभ आहे की अशुभ? काय आहेत शास्त्रीय नियम? जाणून घ्या
कुटुंब नसले तरी हजारो बहिणी -
विशेष म्हणजे खान सरांना स्वतःची कोणतीही बहीण नाही, मात्र ते त्यांच्या विद्यार्थिनींनाच आपल्या बहिणी मानतात. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच ते रक्षाबंधनाला हा उपक्रम राबवत आहेत. आज ते कदाचित जगातील एकमेव भाऊ आहेत, ज्यांच्या मनगटावर एका दिवसात हजारो राख्या बांधण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.