IND vs PAK Handshake Controversy: हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तान क्रिकेटची नाराजी; दुबईत भारताविरुद्ध नोंदवला निषेध
IND vs PAK Handshake Controversy: दुबईमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादाला आता एक नवे वळण लागले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान कर्णधार सलमान अली आघा यांना नाणेफेकीदरम्यान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याशी हस्तांदोलन न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने भारताविरुद्ध क्रीडाभावनेचा अभाव असल्याची तक्रार दाखल केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एका निवेदनात म्हटले, 'मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी नाणेफेकीदरम्यान कर्णधाराला हस्तांदोलन न करण्यास सांगितले. हे वर्तन खेळाच्या भावनेविरुद्ध आहे.' याच निषेधार्थ, कर्णधार सलमान अली आघा सामन्यानंतरच्या सादरीकरणाला अनुपस्थित राहिले.
दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमार यादव यांनी भारताचा सात विकेटने झालेला विजय सशस्त्र दलांना समर्पित केला. त्यांनी म्हटलं की, 'आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. हा विजय माझ्या सशस्त्र दलांना समर्पित आहे ज्यांनी महान शौर्य दाखवले.' सामन्याच्या अखेरीस विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या षटकारानंतर सूर्यकुमार फक्त शिवम दुबेशीच हस्तांदोलन करून ड्रेसिंग रूमकडे परतले, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना अभिवादन टाळले. टॉसच्या वेळी देखील सलमान अली आघा आणि सूर्यकुमार यादव यांनी हस्तांदोलन केले नाही, ज्यामुळे वादाला उधाण आले.
दरम्यान, पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाले, 'ही आमची योग्य प्रतिक्रिया होती. बीसीसीआय आणि सरकारच्या सूचनेनुसार आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही इथे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत, पण जीवनातील काही गोष्टी क्रीडाभावनेपेक्षा महत्त्वाच्या असतात.'