राज्यात मतमोजणीसाठी जय्यत तयारी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. मतमोजणी करुन निकाल शनिवार 23 नोव्हेबर 2024 रोजी जाहीर केले जातील. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी करण्यासाठी एक मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक अशा पद्धतीने 288 मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक नेमले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने दोन मतमोजणी निरीक्षक नेमले आहेत.
मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या नियोजनानुसार प्रत्येक मतदारसंघात सर्वात आधी टपालाने आलेल्या मतांची मोजणी केली जाईल. यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. निवडणूक लढविणारा उमेदवार तसेच उमेदवार ज्या पक्षांशी संबंधित आहेत त्या राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरुपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक हे उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडतील. यानंतर सील ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केली जाईल. मतमोजणीच्या ठिकाणी तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने 288 मतमोजणी केंद्रांवर 1732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस (ETPBMS) स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारले आहेत. मतमोजणीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तसेच परंपरागत पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली जाईल.