पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला झटका! न्यायालयाने फेटाळला जामीन
पुणे: पुण्यात काही महिन्यांपूर्वी स्वारगेट एसटी बस स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला आता मोठा धक्का बसला आहे. कारण, न्यायालयाने आता आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तथापी, न्यायालयाने आरोपीला 'सवयीचा गुन्हेगार' असेही म्हटले आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, आरोपीला पॉर्न पाहण्याची सवय आहे आणि तो पुन्हा हा गुन्हा करू शकतो. तो एक सवयीचा गुन्हेगार आहे. जर त्याला जामिनावर सोडण्यात आले तर तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करेल.
फेब्रुवारीमध्ये पुण्यातील स्वारगेट बस डिपोर्ट येथे पार्क केलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसमध्ये एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. आरोपीने शिवशाही बसचा बस कंडक्टर असल्याचे भासवून, तिला बस स्टँडवरील पार्किंग क्षेत्रात नेऊन पीडितेवर बलात्कार केला होता. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध नोंदवण्यात आला. तथापी, याप्रकरणी पुणे पोलिसांनी 893 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दत्तात्रय रामदास गाडे, असं या आरोपीचं नाव असून सध्या तो तुरुंगात आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने केली आत्महत्या
दरम्यान, आरोपीने दावा केला की तो भाजीपाला विकतो. तसेच त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे. आरोपीने हा खटला खोटा असल्याचा आरोप केला. तसेच पीडितेशी लैंगिक संबंध हे संमतीने घडले, असा दावाही त्याने केला आहे. तथापी, पोलिसांनी सांगितले की, हा भयानक गुन्हा केल्यानंतर, आरोपी गाडे झुडपात लपून बसला होता. अखेर ड्रोन आणि श्वान पथक आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्याला शोधण्यात आले.
हेही वाचा - मद्यप्राशन करून भांडण केल्याने पत्नीने केला पतीचा खून
आरोपीवर यापूर्वी 6 गुन्हे दाखल -
तथापी, या प्रकरणातील आरोपीवर 2009 पासून सहा गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी पाच महिलांनी केलेल्या तक्रारींशी संबंधित आहेत. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की गाडे हा महिलांना लक्ष्य करण्याचा सवयीचा गुन्हेगार आहे. तसेच त्याला जामिनावर सोडल्याने तो फरार होऊ शकतो किंवा पुन्हा गुन्हा करू शकतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पीडितेनेही न्यायालयात हजेरी लावली आणि आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला.