Madhubhai Kulkarni : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकारणात आणणारे आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जेष्ठ प्रचारक मधूभाई कुलकर्णी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. गुरुवारी (18 सप्टेंबर) दुपारी 12.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय क्षेत्रात सक्रिय करण्यामध्ये मधुभाईंचा मोठा वाटा मानला जातो.
मधुभाईंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला भेट दिली होती. 1985 मध्ये गुजरातमध्ये प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींना संघातून भाजपमध्ये सक्रिय केले. त्यानंतर मोदींनी मुख्यमंत्रीपदाची शिखरे गाठली आणि पुढे भारताचे पंतप्रधान झाले.
हेही वाचा :
17 मे 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेले मधुभाई यांचे शालेय शिक्षण चिकोडी येथे झाले. विद्यार्थी जीवनातच त्यांचा परिचय संघाशी झाला. 1954 मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुंबईत उच्च शिक्षणासाठी गेले आणि बीए, बीएड ही पदवी संपादन केली. थोडा काळ त्यांनी सरकारी नोकरी केली, परंतु नंतर पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघ कार्याला वाहून घेतले.
1962 मध्ये जळगाव येथे तालुका प्रचारक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. पुढे त्यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रचारक, सोलापूर विभाग प्रचारक, पुणे महानगर प्रचारक अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1984 ते 1996 दरम्यान ते गुजरातचे प्रांत प्रचारक होते. त्यानंतर 1996 ते 2003 या काळात त्यांनी पश्चिम क्षेत्र प्रचारक म्हणून काम केले. 2003 ते 2009 दरम्यान अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख या पदावरून त्यांनी संघकार्याला दिशा दिली.
2015 पासून ते दायित्वमुक्त होऊन छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले होते. अखेरच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. निधनानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्पण कार्यालयात ठेवण्यात आले असून त्यांनी देहदान करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. त्यांचा देह रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व आर. के. दमाणी मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.