Womens Day 2025: संगीता पंचभाई नागपुरातील पहिल्या महिला मॅकेनिक
नागपूर : गॅरेज व्यवसायावर अधिकांश प्रमाणात पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. मात्र, आता या क्षेत्रात महिला देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे. उपराजधानी नागपूरात राहणाऱ्या संगीता पंचभाई यांनी नागपुरातील पहिली महिला मॅकनिक म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
संगीता या मूळच्या मध्यप्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यातील आहेत. लग्न झाल्यानंतर त्या नागपूरला स्थायिक झाल्या. लग्नानंतर पती संजय पंचभाई हे खाजगी कंपनीत कामाला होते, त्यांचा पगार कमी असल्याने त्यांनी गॅरेज व्यवसाय सुरू केला. मात्र, गॅरेज व्यवसायात त्यांना सहकारी कामगाराची उणीव भासत होती. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे सोबतीला कामगार ठेवणे परवडणार नव्हतं. म्हणून संगीताने पतीच्या कामात मदत करण्यासाठी गॅरेज जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या काम शिकत गेल्या.
हेही वाचा: 'महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घेणार'
संगीता पंचभाई यांनी टू-व्हीलर दुरुस्तीचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्यांनी केवळ निरीक्षणातून वाहन दुरूस्तीचं ज्ञान आत्मसात केलं. त्यांचं कौशल्य बघून ईव्ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी आमंत्रित केलं. आपल्या मुलांना देखील इतर मुलांप्रमाणेचं चांगल्या शाळेत पाठवावं.त्यांनाही चांगलं शिक्षण मिळावं असं सुनीता यांना वाटायचं. त्यासाठी कितीही कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी संगीता यांनी केली.
प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि ही गोष्ट खरीच आहे. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा सहकारी स्त्री आपल्या विविध भूमिकांतून आपल्या आयुष्याला दिशा देत असतात. त्यामुळे संगीता पंचभाई हिने आपल्या आयुष्यातील चढउतारातून खचून न जाता वेगळ्या क्षेत्रात काम करण्याचं मार्ग निवडला. त्यामुळे त्या अनेक महिलांसाठी आज प्रेरणादायी ठरत आहेत. अशा या रणरागिणीला महिला दिनाच्या निमित्ताने जय महाराष्ट्राचा सलाम.