मोठी बातमी! संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस
मुंबई: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शिंदे गटाचे नेते आणि समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट चर्चेत आले आहेत. आता संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. शिरसाट यांनी सांगितले की, आयकर विभागाने त्यांच्या मालमत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे.
आयकर विभागाच्या नोटीसबाबत संजय शिरसाट काय म्हणाले?
आयकर विभागाच्या नोटीसबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, 'ही नोटीस 10 जुलै 2025 रोजी पाठवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये झालेल्या विट्स हॉटेलच्या लिलावात आर्थिक अनियमिततेची शंका विरोधकांनी उपस्थित केली होती, त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. मला आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. माझ्या मालमत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मी उत्तर देण्यासाठी 9 तारखेपर्यंतचा वेळ मागितला आहे. माझ्या 2024 च्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या मालमत्तेबद्दलच्या माहितीच्या आधारे मी उत्तर देईन,' असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटीससंदर्भात यापूर्वी बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं होत की, माझ्याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस मिळाली आहे. परंतु, नंतर त्यांनी त्यांच्या विधानावरून माघार घेतली आणि सांगितले की श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली आहे की नाही हे मला माहित नाही. तथापि, मंत्र्यांनी कबूल केले की त्यांना नोटीस मिळाली आहे.
हेही वाचा - इम्तियाज जलील यांचे शिरसाटांवर गंभीर आरोप
यापूर्वी संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की, 'आयकर विभाग सर्वांची चौकशी करतो. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि मला नोटीस मिळाल्या आहेत. आयकर विभागाला उत्तर द्यावे लागेल. मला 9 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. मी वेळ मागितला आहे आणि आम्ही उत्तर देऊ. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ. आमच्यावर कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही.'
हेही वाचा - कोणालाही मारहाण करणं योग्य नाही; आमदार संजय गायकवाड प्रकरणावर शिंदेंची प्रतिक्रिया
काय आहे नेमकं प्रकरण?
खरं तर हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल लिलावासंदर्भात आहे. या प्रकरणात शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि पत्नी विजया यांचा सहभाग असल्याबद्दल विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. हॉटेलची बाजारभाव किंमत 110 कोटी रुपये होती, परंतु ते 67 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. नंतर शिरसाट यांनी या निविदा प्रक्रियेतून माघार घेण्याची घोषणा केली होती. तरीही, विरोधकांनी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. तसेच आता आयकर विभागाच्या नोटिशीने या वादाला आणखी खतपाणी घातले आहे. तथापि, संजय शिरसाट यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.