'अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन'
मुंबई :अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन होत असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून पंतप्रधान मोदींच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन केले जात आहे. हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. याआधी २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत या टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले आहे; असे नाना पटोले म्हणाले. एकाच प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन करुन भाजपा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल, असेही नाना पटोले म्हणाले.
केंद्रात गुजरातची लॉबी आहे. ही लॉबी महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरात पळवून नेत आहे. यामुळे राज्यात बेरोजगार वाढत आहे, असे नाना पटोल म्हणाले. नागपूरचा अठरा हजार कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प आणि वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये पळवून नेला आहे. वेदांताच्या बदल्यात राज्यात मोठा सेमीकंडक्टर प्रकल्प आणण्याची भाषा केली जात होती... त्याचे काय झाले ? असा सवाल नाना पटोलेंनी महायुती सरकारला विचारला आहे.
पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. सर्व भ्रष्ट लोकांना मोदींनी पक्षात घेतले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात सत्ता आली की या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू, असे नाना पटोले म्हणाले. मोदी सरकारने जवान आणि किसान दोघांची वाताहात केली, असाही दावा नाना पटोलेंनी केला.
विधानसभेची निवडणूक मविआ काँग्रेसच्या नेतृत्वात लढेल आणि सरकार काँग्रेसच्या नेतृत्वातील मविआचे येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला. संजय राऊतांचे ऐकू नका असेही ते म्हणाले.