गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील आठवड्यात फक्त 3 दिवसच सुरु राहणार शेअर बाजार
Stock Market Holiday: पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी व्यापाराच्या संधी मर्यादित असतील. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) 14 एप्रिल (सोमवार) रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर आणि 18 एप्रिल (शुक्रवार) रोजी गुड फ्रायडे निमित्त ते बंद राहील. यामुळे, पुढील आठवड्यात फक्त 15, 16 आणि 17 एप्रिल (मंगळवार ते गुरुवार) रोजी व्यवहार होतील.
या सुट्ट्यांच्या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, चलन बाजार, सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरोइंग (SLB) आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) सारखे सर्व बाजार विभाग बंद राहतील. गुंतवणूकदारांनी या कमी सत्रांना लक्षात घेऊन त्यांची ट्रेडिंग रणनीती तयार करावी. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमी ट्रेडिंग सत्रांमुळे बाजारात अस्थिरता वाढू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा - Gold Price Today: लग्नसराईच्या दिवसात सोन्याचा भाव कमी होईना, जाणून घ्या आजचे दर
14 आणि 18 एप्रिल रोजी बाजार बंद -
दरम्यान, 14 एप्रिल रोजी, डॉ. बी.आर. आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. हा दिवस भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. यानंतर, 15 एप्रिलपासून सामान्य व्यवहार पुन्हा सुरू होतील. त्याच वेळी, 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडे सुट्टीमुळे बाजार पुन्हा बंद राहील. अशाप्रकारे, आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी सुट्ट्या असल्याने, ट्रेडिंग सत्रे मर्यादित झाली आहेत.
एप्रिल 2025 मध्ये बाजाराच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, 10 एप्रिल रोजी श्री महावीर जयंतीनिमित्त बाजार आधीच बंद आहे. यानंतर 14 आणि 18 एप्रिल रोजी सुट्ट्या आहेत. 2025 मध्ये येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन, 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती, 21-22 ऑक्टोबर रोजी दिवाळी, 5 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आणि 25 डिसेंबर रोजी नाताळ यांचा समावेश आहे.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!