Swiggy ला प्राप्तिकर विभागाकडून 158 कोटी रुपयांची कर डिमांड नोटिस
Swiggy Receives Tax Demand Notice: झोमॅटो नंतर आता अन्न आणि किराणा माल डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी प्राप्तिकर विभागाकडून 158 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अतिरिक्त कर मागणी नोटीस प्राप्त झाली आहे. बेंगळुरू येथील सेंट्रल सर्कल 1(1) च्या आयकर उपायुक्तांनी हा आदेश जारी केला आहे. हे प्रकरण प्रामुख्याने व्यापाऱ्यांना दिले जाणारे कॅन्सलेशन चार्ज आणि प्राप्तिकर परताव्यावर मिळालेले व्याज करपात्र उत्पन्नात समाविष्ट न करण्याशी संबंधित आहे.
स्विगीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, या आदेशानुसार त्यांच्या महसुलात 1,58,25,80,987 रुपयांची अतिरिक्त रक्कम जोडण्यात आली आहे. तथापि, कंपनीने स्पष्ट केले की, कंपनी या आदेशाविरुद्ध अपील करेल. तसेच मजबूत युक्तिवादांसह आपली भूमिका मांडेल.
हेही वाचा - Zomato Job Cut: झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं; काय आहे यामागील कारण? जाणून घ्या
तथापि, स्विगीने स्पष्ट केलं आहे की, या ऑर्डरचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर आणि कामकाजावर कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही. कंपनीच्या शेअर्सच्या किमती गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घसरल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत स्विगीचे शेअर्स 38.88% ने घसरले आहेत. तथापि, 1 एप्रिल रोजी स्विगीचे शेअर्स 0.50% वाढीसह 331.55 रुपयांवर बंद झाले.
झोमॅटोला 803.4 कोटी रुपयांची GST डिमांड नोटीस -
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोला डिसेंबर 2024 महिन्यात 803.4 कोटी रुपयांची कर मागणी नोटीस पाठवली होती. यामध्ये व्याज आणि दंड यांचा समावेश होता. या नोटीसमध्ये 410.70 कोटी रुपयांचा जीएसटी आणि तेवढ्याच रकमेचा दंड समाविष्ट होता. तथापि, झोमॅटोने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की, त्यांना डिलिव्हरी शुल्कावरील व्याज आणि दंडासह जीएसटी न भरल्याबद्दल नोटीस मिळाली आहे.