Apple iPhone 17 Air : नव्या फोनच्या कॅमेरात 'बग'; फोटोमध्ये येतोय काळा भाग आणि पांढऱ्या रेषा
iPhone 17 Camera Bug : ॲपलची नवीन आयफोन 17 सीरिज (iPhone 17 Series) बाजारात येताच ग्राहकांनी त्याचे फर्स्ट इम्प्रेशन्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या सीरिजमधील नवीन आयफोन एयर (iPhone Air) मॉडेलच्या कॅमेरात एक तांत्रिक बिघाड (bug) असल्याचे समोर आले आहे. काही वापरकर्त्यांनी फोटोमध्ये काळे भाग किंवा विचित्र पांढऱ्या रेषा दिसत असल्याची तक्रार केली आहे.
कॅमेऱ्यातील नेमकी समस्या काय? सुरुवातीला, एका टेक जर्नलिस्टने iPhone Airचे रिव्ह्यू करताना ही समस्या शोधली. कॉन्सर्टचे फोटो घेताना त्याने पाहिले की, 10 पैकी एका फोटोमध्ये काही भाग काळा किंवा विचित्र चौकोनी आकाराचा दिसत होता, तर काहीमध्ये पांढऱ्या रेषा येत होत्या. ही समस्या विशेषतः एलईडी डिस्प्लेचे फोटो घेताना अधिक जाणवत असल्याचे त्याने सांगितले.
ॲपलने समस्या केली मान्य ॲपल कंपनीनेही हा बग असल्याचे मान्य केले आहे. कंपनीने सांगितले की, प्रकाशाच्या काही विशिष्ट तीव्रतेच्या परिस्थितीत (lighting conditions) हा बिघाड दिसून येत आहे. ही एक सॉफ्टवेअरची समस्या असून, ती दुरुस्त करण्यात आली आहे. लवकरच एका नवीन अपडेटमध्ये ही दुरुस्ती रोल आउट केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, हे अपडेट कधीपर्यंत येईल, याबाबत कंपनीने कोणतीही तारीख दिलेली नाही.
आयफोन एयर: ॲपलचा सर्वात स्लीम फोन ॲपलने या वर्षी आयफोन 17 सीरिजमध्ये प्लस मॉडेलऐवजी आयफोन एयर लाँच केला आहे. याची जाडी केवळ 5.6mm आहे, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम बॉडी असलेला आयफोन ठरला आहे. यात 6.5 इंचाची प्रोमोशन टेक्नॉलॉजी असलेली स्क्रीन आहे. फोनच्या मागील बाजूला 48MP चा सिंगल कॅमेरा आणि समोर 18MP चा 'सेंटर स्टेज' कॅमेरा आहे. A19 Pro चिपसेट असलेल्या या फोनची भारतातील सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे.