मनोज बाजपेयी पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी लोकप्

The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन 3' लवकरच प्रेक्षकांसमोर; मनोज बाजपेयी यांची थरारक वेबसिरीजचा थ्रिलर पुन्हा सज्ज

मुंबई : मनोज बाजपेयी पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी लोकप्रिय गुप्तहेर थ्रिलर सिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या भागासह सज्ज झाले आहेत. मागील दोन सीझन्सना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता प्रेक्षकांची नजर ‘फॅमिली मॅन 3’ कडे लागली आहे. अहवालांनुसार ही मालिका ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीला ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा रोमहर्षक कथा अनुभवायला मिळणार आहे.

यावेळी मालिकेत नवे कलाकार दिसणार आहेत. जायदीप अहलावत मुख्य खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असून, निम्रत कौर हिचाही महत्त्वाचा सहभाग असेल. याशिवाय दर्शन कुमार पुन्हा एकदा मेजर समीअरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मनोज बाजपेयी (श्रीकांत तिवारी), प्रियमणी (सुचित्रा), शरीब हाशमी (जेके), अश्लेशा ठाकूर (ध्रुती) आणि वेदांत सिन्हा (अथर्व) हे आपापल्या परिचित भूमिकेत परतणार आहेत.

हेही वाचा : PM Narendra Modi Biopic: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘मा वंदे’ चित्रपटात उन्नी मुकुंदन

सीझन 2 जिथे एका जबरदस्त रहस्यमय वळणावर संपला होता, तिथूनच या नवीन भागाची कथा पुढे सरकणार आहे. श्रीकांत तिवारीला यावेळी कुटुंबातील गुंतागुंतींसोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर संकटांचा सामना करावा लागणार आहे. या संघर्षात त्याची टीम मर्यादांच्या पलीकडे जाऊन झुंजताना दिसेल, असे निर्माते राज आणि डीके यांनी सांगितले आहे. हा भाग सुमन कुमार आणि तुषार सेठ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला असून, आतापर्यंतच्या सर्व सीझन्समधील हा सर्वाधिक थरारक ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘फॅमिली मॅन 3’चा उत्साह प्रेक्षकांमध्ये उच्चांक गाठत आहे.