जळगावातल्या या 7 जणांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत
जळगाव : राज्यात सत्तास्थापनेची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात नवी मुख्यमंत्री कोण होणार ? अशी चर्चा असतानाच जळगावातील सात जणांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागील सरकारमध्ये मंत्री असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर अनिल पाटील यांनादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे. जळगावातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील या नावांव्यतिरिक्त सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, संजय सावकारे यांची नावेही चर्चेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत जळगावातील 11 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. ते 11 आमदार मुंबईला रवाना झाले आहेत. लवकरच महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार आहे. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्याचबरोबर लेवा पाटील समाजाचे असल्याने भाजपाकडून त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पाचोऱ्याचे किशोर पाटीलही तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर किशोर पाटील हे सर्वात आधी एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रिमंत्रिपदासाठी समोर येत आहे.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपमधील नवीन नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. अमित शाह यांच्या चाळीसगावमधील सभेत नव्या मंत्रिमंडळात चव्हाण यांना स्थान असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यातच चव्हाण हे फडणवीस व महाजन यांचेही निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनाही मंत्रीपद मिळाली अशी चर्चा आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जळगावचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांचे नावही मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहे.