केस धुण्यासाठी थंड की गरम कोणते पाणी योग्य? ते आठवड्यातून किती वेळा धुवावे? जाणून घ्या
मुंबई: तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी चांगली केस उत्पादने वापरून नियमित केस धूणे आवश्यक असते. केसांची काळजी घेताना काही सामान्य प्रश्न मनात येत असतात. ज्याबाबत आपण संभ्रमात असतो. जसे की, आपले केस किती वेळा धुतले पाहिजेत, केस धुण्यासाठी कोणता शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे योग्य आहे, तुमच्या केसांसाठी कोणता हेअर मास्क वापरावा आणि चांगल्या केसांसाठी तुमचा आहार कसा असावा? या सर्व प्रश्नांप्रमाणेच आणखी एक प्रश्न नेहमी मनात येतो. तुम्ही केस थंड पाण्याने धुतले पाहिजेत की गरम, तुमच्या मनातही हा प्रश्न निर्माण होत असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.
सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ वंदना पंजाबी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या महितीनुसार, "केस धुण्यासाठी गरम पाणी वापरणे अत्यंत हानिकारक ठरू शकते, कारण ते केसांचे निर्जलीकरण करते आणि त्यांना रुक्ष, कोरडे आणि कमकुवत करते. गरम पाण्यामुळे केसांची मुळेदेखील खराब होतात, त्यामुळे ते फुटतात. दुसरीकडे, थंड पाणी केसांसाठी सर्वोत्कृष्ट आहे, कारण ते केसांच्या मुळांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहचवत नाही आणि त्याऐवजी त्यांची देखभाल करते. थंड पाणी प्रत्येकासाठी सोयीस्कर नसल्यामुळे, ते कोमट वापरू शकतात. पण गरम पाणी नक्कीच वापरू नये".
हेही वाचा: Hair Fall Astrology: वारंवार होणाऱ्या केसगळतीला ग्रह जबाबदार?
याबाबत, सौंदर्यशास्त्रसंबंधी त्वचाशास्त्रज्ञ आणि ओपरा अस्टेटिक्सच्या संस्थापक, डॉ. आकांक्षा संघवी, यांचे मत थोडे वेगळे आहे. त्यांच्या मते, "केस गरम पाण्यानेच धुतले पाहिजेत. केस धुताना सुरुवातीला गरम किंवा कोमट पाणी वापरल्यास केसांची मुळे उघडतात. टाळू व केसांचा तेलकटपणा काढून टाकण्यासाठी शॅम्पू प्रभावीपणे काम करण्यास मदत करतो. पण शॅम्पू केल्यानंतर थंड किंवा साधे पाणी वापरणे आवश्यक असते. जेणेकरून केसांवरील कंडिशनर किंवा हेअरमास्क व्यवस्थित धुतला जाईल आणि केसांच्या मुळांना पुन्हा बंद होण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहील आणि रुक्षपणा कमी होईल आणि तुमच्या केसांना चांगली चमक येईल".
डॉ.संघवी यांनी केसांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार केस किती वेळा धुतले पाहिजेत? याबाबत माहिती दिली आहे.
तेलकट केस (Oily hair) - तेलकट केस रोज धुणे सुरक्षित आहे, त्यामुळे तुमच्या टाळूवरील बुरशीजन्य त्वचासंसर्ग कमी करतो. तसेच केसांमधील कोंडा कमी करतो. पण जेव्हा तुम्ही तेलकट केस धुता तेव्हा पीएच बॅलन्स करणारा शॅम्पू व केसांच्या टोकांना कंडिशनर वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
कोरडे केस (Frizzy hair) - काही लोकांचे केस जन्मत:च कोरडे असतात. तर काही लोकांचे केस रंगविल्यामुळे किंवा स्ट्रेटनिंग करण्यामुळे खराब होतात. कोरडे केस सल्फेट फ्री शॅम्पूने आठवड्यातून दोनदा धुतले पाहिजे. हा शॅम्पू केसांच्या नैसर्गिक तेलाचे संरक्षण करतो आणि केस आणखी कोरडे होणे टाळतो. केसांना शॅम्पू केल्यानंतर प्रत्येक वेळी हेअर मास्क वापरा, जो केसांना नैसर्गिक तेल पुरवितो आणि केसांना पोषण करण्यासाठी त्यांचा अर्क मागे सोडतो.
कुरळे केस (Curly hair) - कुरळ्या केसांना सुळसुळीत आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कुरळ्या केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास केसांचा गुंता खूप होऊ शकतो आणि दिवसभर त्यांना सांभाळणे कठीण होऊ शकते. कुरळ्या केसांना सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने आणि चांगला हायड्रेटिंग कंडिशनर वापरून आठवड्यातून दोन-तीन वेळा धुतले पाहिजे. कुरळ्या केसांना खूप ओलावा पुरविण्याची गरज असते. को-वॉशिंग ही कुरळे केस असलेल्यांनी आत्मसात केलेली अत्यंत चांगली पद्धत आहे. को-वॉशिंग ही पद्धत तेव्हा वापरली जाते जेव्हा तुम्हाला आठवड्याच्या मध्यंतरी कुरळे केस धुण्याची गरज असते पण शॅम्पू वापरून तुम्हाला केस कोरडे करायचे नसतात. को-वॉशिंग म्हणजे केस धुण्यासाठी तुमच्या हेअर कंडिशनरचा वापर करणे. ही पद्धत त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्याने त्यांचे कुरळे केस दररोज न धुता ओले आणि सुळसुळीत ठेवायचे आहेत. कुरळे केस धुतल्यानंतर आणि कंडिशनर वापरल्यानंतर त्यांना शिया बटर आणि कोकोआ बटरने समृद्ध असलेले curl cream किंवा a leave-in conditioner वापरणं आवश्यक आहे.
हेही वाचा: जुना फ्रीज बनवा नवीन! हे 'सिक्रेट' तुम्हाला कंपनीही सांगणार नाही आणि दुरुस्ती करणारेही..
केस धुतल्यानंतर केली जाणारी सर्वात मोठी चूक कोणती? केस धुतल्यानंतर ओल्या केसांना साध्या ब्रशने किंवा लहान दातांच्या कंगव्याने विंचारणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते, कारण असे केल्यामुळे तुमचे ओले केस तुटू शकतात. केस तुटू नयेत यासाठी मोठ्या दातांचा कंगवा किंवा लवचिक दात असलेला गुंता सोडविणारा ब्रश वापरण्याचा सल्ला दिला जातो. हेअर मास्क लावल्यानंतर केस धुतांना गुंता सोडविण्यासाठी आणि कंडिशनर सर्वत्र व्यवस्थित लावण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. जाड केसांसाठी हा कंगवा उत्तम प्रकारे काम करतो.
केस धुताना काय करावे आणि काय करू नये? काय करावे: आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केस धुवावेत. काय करावे: केस धुण्याआधी विंचरावेत. काय करावे: शॅम्पू लावल्यानंतर ताबडतोब धुऊन टाका (फक्त अँटी डँड्रफ शॅम्पू एक मिनिट केसांना लावून ठेवावा) काय करावे: टाळूसाठी दातेरी स्कॅल्प स्क्रॅबल वापरा. काय करावे: केसांना सुकविण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता.
काय करू नये: केसांसाठी कठोर शॅम्पू आणि कंडिशनर वापरू नये. काय करू नये: ओले केस बांधू नये. काय करू नये: केस धुताना तुमच्या टाळूला नखांनी ओरखडू नका काय करू नका : ओले केस टॉवेलने जोरात पूसू नका काय करू नये: केसांसाठी अतिप्रमाणात शॅम्पू वापरू नका.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)