Cancer Vaccine: कर्करोगाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! नवीन mRNA लसीला अभूतपूर्व यश
Cancer Vaccine: वैद्यकीय जगात आजवर अनेक संशोधन झाले आहेत, पण अजूनही कर्करोग हा सर्वात धोकादायक आणि कठीण आजार मानला जातो. जगभरात लाखो लोक या आजाराशी झुंज देत आहेत. फक्त अमेरिकेतच 2025 पर्यंत जवळपास 20 लाखांहून अधिक नवीन कर्करोग रुग्ण आणि 6 लाखांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मात्र, याच काळात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक अत्याधुनिक mRNA लस विकसित केली आहे, जी प्रयोगात्मक टप्प्यात उंदरांवरील कर्करोगाच्या ट्यूमरवर प्रभावी ठरली आहे. या लसीमुळे उंदरांच्या शरीरातील ट्यूमर पूर्णपणे नष्ट झाले. या संशोधनामुळे आता मानवी कर्करोग उपचारात क्रांती घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
mRNA लसीचे वैशिष्ट्य -
सामान्यपणे कर्करोगावरील औषधे थेट ट्यूमर पेशींवर हल्ला करतात, पण ही नवी mRNA लस वेगळ्या पद्धतीने काम करते. ती थेट कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करत नाही, तर शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला जागृत करते. त्यामुळे शरीर स्वतः कर्करोग पेशी ओळखून त्यांचा नाश करते. यामुळे भविष्यात तिला सार्वत्रिक कर्करोग लस म्हणून संबोधले जाऊ शकते.
ही लस कशी काम करते?
या लसीमुळे शरीरात PD-L1 नावाच्या प्रथिनाची अभिव्यक्ती वाढते. PD-L1 हे ट्यूमर पेशींना अशा स्वरूपात आणते की त्या इम्युनोथेरपी औषधांचे सोपे लक्ष्य बनतात. संशोधकांनी जेव्हा ही लस आणि कर्करोगाची औषधे एकत्र दिली, तेव्हा उंदरांमधील ट्यूमर अतिशय वेगाने कमी झाले.
हेही वाचा - Health Tips: आवळा खाताय मग सावधान...., 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये
आतापर्यंत कर्करोगावरील लसी तयार करण्यासाठी दोन पद्धती प्रचलित होत्या. यातील पहिली पद्धत म्हणजे बहुतेक कर्करोगांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांना लक्ष्य करणे आणि दुसरी पद्धत म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरनुसार वेगळी लस तयार करणे. मात्र, या नव्या संशोधनाने तिसरा मार्ग दाखवला आहे. या लसीमुळे नवी आशा निर्माण झाली आहे. हा शोध अजूनही प्रायोगिक टप्प्यात असला तरी, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही लस भविष्यात कर्करोग उपचारातील सर्वात मोठी क्रांती ठरू शकते. जर ती मानवी चाचण्यांमध्येही यशस्वी ठरली, तर जगभरातील कोट्यवधी कर्करोग रुग्णांना जीवनदान मिळू शकते.