Banana Peel Benefits: केळीच्या सालीत दडलं आहे नैसर्गिक पोषण; संशोधकांनी केला 'हा' खुलासा
Banana Peel Benefits: केळी हा भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. केळी खाल्ल्यानंतर त्याची साल आपण सर्रास कचऱ्यात फेकून देतो. पण, अलीकडच्या संशोधनातून असे समोर आले आहे की केळीची साल ही आरोग्यासाठी मोठा खजिना ठरू शकते. अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, केळीच्या सालीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. हे घटक शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढून आपल्याला विविध रोगांपासून संरक्षण देतात.
केळीच्या सालीतील पोषक घटक
जपानी संशोधक सोमेया आणि त्यांच्या टीमच्या अभ्यासानुसार, केळीच्या सालीमध्ये गॅलोकेटेचिन नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आढळतो. तो शरीराला आतून स्वच्छ करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. तसेच, इंडोनेशियातील संशोधनाने दाखवून दिले आहे की, सालीत आढळणारे फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन आणि सॅपोनिन हे घटक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास सक्षम आहेत. मुक्त रॅडिकल्समुळे पेशींवर होणारे नुकसान टाळल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
हेही वाचा - Papaya Side Effects: सुपरफ्रूट की सायलेंट किलर? काहींसाठी पपई ठरते घातक
बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी शस्त्र
केळीच्या सालीमध्ये बॅक्टेरियाविरोधी क्षमता प्रचंड असल्याचेही संशोधनाने सिद्ध केले आहे. केळी ई.कोलाई, साल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस सारख्या धोकादायक जीवाणूंना नष्ट करण्यास मदत करते. यामुळे पोटाचे विकार, ताप किंवा दात-हिरड्यांचे आजार टाळण्यास मदत मिळते.
याशिवाय, सालीतील गॅलिक अॅसिड, फेरुलिक अॅसिड आणि कॅटेचिन हे घटक बुरशीशी लढण्यास प्रभावी आहेत. विशेष म्हणजे, केळीच्या सालीचा नैसर्गिक रंग म्हणून वापर केला तरीही तिचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म अबाधित राहतात. या सर्व निष्कर्षांमुळे केळीची साल कचऱ्यात टाकताना एकदा नक्की विचार करा. भविष्यात केळीच्या सालीचा वापर आरोग्यपूरक पदार्थ, नैसर्गिक औषध किंवा पर्यावरणपूरक उत्पादनांमध्ये अधिक प्रमाणात होऊ शकतो.
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)