Benefits of Papaya Seeds: पपईच नव्हे तर त्याच्या बिया देखील आरोग्यासाठी खजिना! योग्य वेळ आणि सेवनाची पद्धत जाणून घ्या
Benefits of Papaya Seeds: पपई हे आरोग्यासाठी उपयुक्त आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. ते केवळ फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध नसून, पचन सुधारण्यात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही मदत करते. मात्र, पपईचे फायदे फक्त तिच्या गरापुरते मर्यादित नाहीत. कारण, पपईच्या बिया देखील तितक्याच पौष्टिक आहेत. बहुतेक वेळा निरुपयोगी समजून आपण पपईच्या बिया फेकून देतो. परंतु, या बियांमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, ज्यामुळे त्या एक प्रकारचे ‘सुपरफूड’ ठरतात.
यकृताच्या आरोग्यासाठी उपयुक्त -
पपईच्या बियांमध्ये ग्लुकोसिनोलेट्स आणि अल्कलॉइड्स सारखी संयुगे आढळतात, जी यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात. ही संयुगे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून यकृताला डिटॉक्स करतात. त्यामुळे यकृताच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून पपईच्या बियांचे सेवन फायदेशीर ठरते.
मूत्रपिंडांचे संरक्षण -
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या पपईच्या बिया मूत्रपिंडाला ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळीपासून वाचवतात. संशोधनानुसार, पपई बियांच्या अर्काचे नियमित सेवन केल्याने मूत्रपिंडातील फायब्रोसिस कमी होतो आणि त्यांचे कार्य अधिक चांगले राहते.
पचन सुधारते -
पपईच्या बियांमध्ये ‘पपेन’ नावाचे नैसर्गिक पाचक एंझाइम असते, जे प्रथिनांचे पचन सुलभ करते. याशिवाय, त्यातील फायबर आतड्यांची हालचाल सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पचनसंस्थेतील जळजळ कमी करण्यात मदत करते. त्यामुळे पोटाचे आरोग्य टिकवण्यासाठी पपईच्या बिया उपयुक्त ठरतात.
हेही वाचा - Health Tips : 'हार्ट अटॅकला चुकून गॅसची समस्या समजू नका,' जाणून घ्या, कसा ओळखायचा फरक
पपईच्या बिया सेवन करण्याची पद्धत -
पपईच्या बिया वाळवून त्यांची पावडर तयार करून स्मूदी, सॅलड किंवा मधात मिसळून सेवन करता येते. तसेच, बिया बारीक करून गरम पाण्यात 5-10 मिनिटे भिजवून त्याचे पेयही घेता येते. प्रौढ व्यक्तींनी दररोज अर्धा ते 1 चमचा सुक्या बियांचे सेवन करावे. मात्र, गर्भधारणेदरम्यान पपईच्या बियांचे सेवन टाळावे, कारण त्यातील काही घटक गर्भासाठी हानिकारक ठरू शकतात.
हेही वाचा - Mental Health: दररोज पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येते? जाणून घ्या शरीर देत असलेला खास सिग्नल
पपईच्या बियांना आहारात सामील केल्यास, त्या पचन सुधारण्याबरोबरच यकृत आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण देतात. त्यामुळे पुढच्या वेळी पपई खाल्ल्यानंतर तिच्या बिया फेकण्याऐवजी त्यांचा योग्य पद्धतीने वापर करून त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांचा नक्की लाभ घ्या.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)