Breast Cancer: 'हा' सामान्य आजार स्तनाच्या कर्करोगाला बनवतो आणखी प्राणघातक; नवीन अभ्यासातून खुलासा
Breast Cancer: आजच्या धावपळीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेक आजार जन्म घेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे टाइप-2 मधुमेह. मात्र, अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासात असे आढळून आले आहे की हा आजार फक्त रक्तातील साखर नियंत्रित करण्यापुरता मर्यादित नसून तो स्तनाच्या कर्करोगाला अधिक आक्रमक बनवू शकतो. बोस्टन विद्यापीठातील चोबानियन आणि अवेडिशियन स्कूल ऑफ मेडिसिन येथील संशोधकांच्या मते, टाइप-2 मधुमेहामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीत बदल होतो. यामुळे कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये असलेल्या रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होतात. परिणामी, शरीर ट्यूमरची वाढ रोखण्यात अयशस्वी ठरते. त्यामुळे स्तनाचा कर्करोग जलदगतीने पसरतो.
शास्त्रज्ञांना असेही आढळले की, मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तात असलेले एक्सोसोम्स नावाचे सूक्ष्म कण ट्यूमरमधील रोगप्रतिकारक पेशींना पुन्हा प्रशिक्षित करतात. त्यामुळे त्या आपली मूळ क्षमता गमावतात. हे पहिल्यांदाच सिद्ध झाले आहे की मधुमेहामुळे बदललेले एक्सोसोम मानवी स्तनाच्या ट्यूमरमधील रोगप्रतिकारक क्रियांना थेट दडपू शकतात.
या अभ्यासासाठी वैज्ञानिकांनी स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या ट्यूमरमधून नमुने घेतले. प्रयोगशाळेत 3D ट्यूमर मॉडेल तयार करण्यात आले आणि सिंगल-सेल RNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने रोगप्रतिकारक पेशी कशा प्रकारे कार्य करतात हे तपासले.
स्तनाचा कर्करोग आणि धोका
स्तनाचा कर्करोग हा आधीच एक गुंतागुंतीचा रोग आहे. त्याचे काही प्रकार तुलनेने हळूहळू वाढतात, तर काही अत्यंत आक्रमक असतात, जसे की ट्रिपल-निगेटिव्ह आणि इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सर. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, 40 वर्षांखालील महिलांमध्ये आक्रमक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
हेही वाचा - Banana Peel Benefits: केळीच्या सालीत दडलं आहे नैसर्गिक पोषण; संशोधकांनी केला 'हा' खुलासा
प्रतिबंधासाठी टिप्स -
दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध आहार घेणे. नियमित आरोग्य तपासणी व रक्तातील साखरेचे परीक्षण करणे. पुरेशी झोप घेणे व ताण कमी ठेवणे. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नसल्यास किंवा तयार झालेले इन्सुलिन योग्य पद्धतीने वापरले गेले नाही, तर टाइप-2 मधुमेह होतो. दीर्घकाळ रक्तातील साखर वाढलेली राहिल्यास हृदय, मूत्रपिंड, नसा आणि डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. आता या यादीत स्तनाच्या कर्करोगाचा अधिक धोकाही समाविष्ट झाला आहे.
(Disclaimer: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)