Why Dog Bark At Strangers : तुमच्यावर कुत्रा भुंकतोय? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण
मुंबई: रस्त्यावरून जाताना अनेकदा तुम्ही कुत्र्यांना भुंकताना पाहिलाच असाल. पण ही कुत्री काही ठराविक लोकांवरच जोरजोरात भुंकतात. तुम्हाला माहित आहे का? हा केवळ योगायोग नाही, तर यामागे ठोस वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
वास घेण्याची अप्रतिम क्षमता
माणसांच्या तुलनेत कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अंदाजे 40 पटीने जास्त असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा स्वत:चा वास असतो, जो कपडे, परफ्यूम किंवा त्वचेतून येणाऱ्या वासातून कुत्रा सहजपणे ओळखू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा वास कुत्र्याला त्रासदायक वाटला, तर तो कुत्रा संबंधित व्यक्तीवर भुंकून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो.
शरीरभाषा आणि चेहऱ्यावरील हावभाव
कुत्रे माणसांची शरीरभाषा चांगल्या प्रकारे वाचतात. जर एखादी व्यक्ती अचानक हालचाल केली किंवा थेट डोळ्यांत बघत असेल तर कुत्र्याला तो हल्ला किंवा धोका वाटू शकतो. यादरम्यान, तो स्वत:ला किंवा आपल्या मालकाला सुरक्षित ठेवण्यासाठी भुंकतो.
भूतकाळातील काही वाईट अनुभव
जर भूतकाळात एखाद्या कुत्र्याला काही वाईट प्रवृत्तींच्या लोकांकडून वाईट अनुभव मिळाला असेल, तर ही कुत्रे काही लोकांना पाहून भुंकतात.
परिसराचे रक्षण करण्याची भावना
कुत्रे नैसर्गिकरीत्या त्यांच्या परिसराचे रक्षण करतात. जर त्यांच्या मालकाच्या घरात किंवा परिसराजवळ अनोळखी व्यक्ती आली तर, त्या व्यक्तीला इशारा देण्यासाठी ही कुत्रे भुंकतात.
वंश आणि जातीचे वैशिष्ट्य
काही जातींची कुत्रे अधिक सतर्क असतात आणि अनोळखी लोकं दिसताच पटकन भुंकतात, तर काही जातींची कुत्रे शांत असतात. उदा. जर्मन शेफर्ड, डॉबर मॅन, किंवा ग्रेट डेन हे खास संरक्षण करणारी कुत्रे असल्याने त्यांचा प्रतिसाद अधिक तीव्र असतो.