लाडकी बहीण योजनेत 10 हजार अर्ज अपात्र
पुणे : महायुती सरकारकडून महिलांना आर्थिक मदतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत 10 हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात योजनेसाठी 21 लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 20 लाख 84 हजार अर्जदारांना या योजनेचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, छाननीदरम्यान 9,814 अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत, तर 5,814 अर्ज किरकोळ त्रुटींसह तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.
योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित अर्जदारांना संधी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. अर्जामध्ये आधार क्रमांक, बँक खात्याचे तपशील, आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा चुकीची माहिती या त्रुटींचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.