बोगीवर अडकलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू
विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: शहरात क्रिकेट खेळत असताना, एक चेंडू रेल्वेच्या बोगीवर गेला. त्यामुळे, जेव्हा 10 वर्षीय मुलगा चेंडूला काढण्यासाठी रेल्वेच्या बोगीवर चढला, तेव्हा हायटेन्शन तारेचा स्पर्श होऊन शॉक लागल्याने तो गंभीररीत्या भाजला. ही घटना गुरुवारी रेल्वेस्टेशनच्या मालधक्का येथे घडली असून उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. अयान सलीम शेख (वय: 10 वर्ष, रा. राहुलनगर, सादातनगर) असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा: प्रवीण गायकवाड हल्ला प्रकारणावर अंधारे आक्रमक; बावनकुळे काय म्हणाले?
नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी दुपारी अयान आणि त्याचे मित्र बीड बायपासवरील गेटजवळील रेल्वे स्टेशनच्या आवारात क्रिकेट खेळत होते. खेळताना चेंडू स्टेशनवर असलेल्या मालगाडीच्या डब्यावर जाऊन अडकला. त्यामुळे, चेंडूला परत मिळवण्यासाठी अयानच्या मित्रांनी त्याला मालगाडीच्या डब्यावर चढण्यासाठी मदत केली. अयानने धाडस दाखवत रेल्वेच्या बोगीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा अयानच्या डोक्यावर असलेल्या एका उच्च दाबाच्या विद्युत तारेचा त्याला स्पर्श झाला. त्यामुळे, तो भाजला आणि लांब फेकला गेला. ही बाब त्याच्या इतर मित्रांनी धावत जाऊन परिसरातील लोकांना माहिती दिली. त्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.