राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने शाहू जयंती सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. शाहू स्मारक आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले होते.
यानिमित्ताने, दसरा चौक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेला लक्ष्मी विलास पॅलेस आणि शाहू समाधी स्थळासह कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 8 वाजता राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट यांच्यावतीने दसरा चौकातील शाहू स्मारकावर उपस्थित रहात शाहु स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वत्र 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे समता दिंडीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 8:30 वाजता दसरा चौकातून सुरू झालेली ही दिंडी शहरातील मुख्य मार्गांवरून नेण्यात आली. या दिंडीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.